16 लाख 81 हजारांचा ऐवज हस्तगत
सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
उरण तालुक्यातील चिर्ले गावच्या हद्दीमध्ये चोरीच्या मार्गाने आणलेले डिझेल वाहन चालकांना स्वस्त दरामध्ये विक्री करून, शासनाचा महसूलाची लूट करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे डिझेल बाजार भावापेक्षा 40 टक्के कमी भावाने विक्री केली जात होती. 16 लाख 81 हजार 500 रुपयांचा ऐवज पोलिसांनी कारवाईदरम्यान हस्तगत केला असून, दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
करंजा गावातही बोटींना बायो डिझेल स्वस्त दरात विक्री केला जात असल्याची चर्चा सुरू आहे. उरण तालुक्यामध्ये असणाऱ्या जेएनपीटी बंदरामुळे येथील रस्त्यावर अवजड वाहने मोठ्या प्रमाणात धावत असतात. तर या वाहानांना इनधनाची गरज देखील मोठ्या प्रमाणात लागत असते. याचाच फायदा घेत काही संधीसाधूंनी चोरीच्या मार्गाने आणलेले बायो डिझेल विक्रीचा व्यवसाय येथील चिर्ले गावानजीक सुरू केला असल्याचे पोलिसांना समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकून एक टँकर, साठवण करण्याच्या टाक्या, पंप मशीन असा एकूण 16 लाख 81 हजात 500 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
यातील आरोपी कल्पेश संतोष माने, कादिर मकबूल अहमद या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, भारतीय दंड विधान 385, 336, 34 कलमानुसार उरण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अशाच प्रकारच्या बायो डिझेलची विक्री करंजा गावाजवळ असलेल्या तरीच्या धक्क्यावरून बोटींना डिझेलची विक्री केली जात आहे. दिवसाला दोन टँकर बायो डिझेलची विक्री होत असल्याचे अधिकृत सूत्राकडून समजते.







Be First to Comment