Press "Enter" to skip to content

अलिबाग नगरपरिषदेच्या 44 कोटी 76 लाखांचा अर्थसंकल्प मंजूर


कोणतीही दरवाढ नसलेला अर्थसंकल्प : पाणी, रस्ते आणि आरोग्य या घटकांवर विशेष भर

सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन ।

अलिबाग नगरपरिषदेच्या सन 2020-21 चा सुधारित आणि सन 2021-22 च्या अर्थसंकल्पाचे अंदाजपत्रक अलिबाग नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेमध्ये मंजूर करण्यात आले. सदर अर्थसंकल्प 44 कोटी 76 लाख रुपयाचा असून या अर्थसंकल्पामध्ये अलिबागच्या नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा नवीन आर्थिक बोजा किंवा कराची वाढ करण्यात आलेली नाही.

कोरोनाकाळात पालिकेचे उत्पन्न घटलेले असताना तसेच शहरातील पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता पाणी, रस्ते आणि आरोग्य या घटकांबर विशेष भर या अर्थसंकल्पात देण्यात आलेला असून शहरातील मागासवर्गीय, अपंग तसेच महिला व बालके यांचे जीवनमान सुधारणे, शहराचे सुशोभीकरण, नमिता नाईक क्रीडा संकुलाची उभारणी, शहरातील मुख्य रस्ते स्वच्छ करणे, उर्दू शाळेस विशेष तरतूद, रायवाडी उद्यान यासारख्या विविध विकासात्मक बाबींवर सविस्तर चर्चा करून अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली.

सदर अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात महसुली, भांडवली तसेच इतर उत्पन्नातून 44.76 कोटी उत्पन्न अपेक्षित घरले असून त्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण कामाचे अनुदान, जिल्हा नगरोत्थान, 15 वा वित्त आयोग यातून निरधी अपेक्षित आहे. खर्चाच्या बाजूचा विचार करता शहरातील आवश्यक त्या सर्व कामांचा समावेश करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आला आहे.
आरोग्य सुविधा तसेच नैसर्गिक आपत्ती करिता अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे शहरांमध्ये सुरक्षिततेच्या कारणासाठी सीसीटीब्ही लावण्यात येणार असून त्याकरिता सहा कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दिवसेंदिवस अलिबाग शहर हे पर्यटकांकरिता आकर्षणाचा बिंदू ठरत असून शहरात येणाच्या अनेक पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षण असणा-या आंग्रे समाधीच्या ठिकाणी लाईट अँड साऊंड शोसाठी 5 कोटीची तरतूद केली असून नवीन रस्त्यांकरिता 1 कोटी 35 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य व्यवस्थेवर ही आवश्यक ती पुरेशी तरतूद करण्यात आलेली आहे.

घनकचरा व्यवस्थापन हा सध्याचा महत्त्वाचा विषय असून त्याकरता अर्थसंकल्पात 1 कोटी 20 लाखांची तरतूद केली असल्याचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सांगितले. शहरातील पाणीपुरवठा योजनावर मोठा खर्च होत असून त्यामानाने पाणीकराच्या रुपाने मिळणारे उत्पन्न तुटपुंजे आहे तरीही नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि त्यातून योग्य पाणीपुरवठा व्हावा या दृष्टिकोनातून अलिबाग कोळीवाडा आणि ब्राह्मण आळीमध्ये स्वतंत्र पाणी साठवण्यासाठी टाकी बांधण्यात येणार असून त्यामुळे शहरांमधील पाणीपुरवठा सुरळीत होऊन शहरामध्ये पाण्याचा तुटबडा राहणार नाही असा विश्‍वास नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी व्यक्त केला.

दुर्बल घटकांकरिता अर्थसंकल्पात 40 लाखाची तरतूद करण्यात आलेली असून अंध-अपंग नाग्गारकांसाठी 24 लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे. महिला बालकल्याण विभागासाठी स्वतंत्र 40 लाखांची तरतूद करण्यात आलेली असून शहरातील रायवाडी विभागातील गार्डनचे काम सुरु असून ते या आर्थिक वर्षांत नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. शहरामध्ये उर्दू शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुद्धा सुरू आहे आणि त्याकरिता शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकामासाठी 70 लाखांची तरतूद करण्यात आलेली असून मुस्लिम समाजभवनासाठी सुद्धा विशेष तरतूद करण्यात आली आहे असे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सांगितले. बौद्ध समाज तसेच कोळी समाज यांच्या करिता असलेली स्मशानभूमी अद्यावत करून त्याठिकाणी आवश्यक त्या सर्व सुधारणा करण्यात येतील, याबरोबरच रामनाथ येथील स्मशानभूमी सुद्धा विकसित करण्यात काम हाती घेण्यात येणार आहे.

सिद्धार्थनगर मध्ये बाल्मिकी समाज मंदिराची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे. अलिबाग शहर झपाट्याने वाढत असून अलिबाग बाजारपेठेमध्ये सर्वांना सोयीचे अशा मीनाबाजारची जुनी इमारत पाडून त्याठिकाणी अद्यावत शॉपिंग कॉम्प्लेक्स करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचे काम लबकरच सुरु करण्याचा प्रयत्न राहील, अर्थसंकल्पाबाबत बोलताना मागील 5 वर्षात शहरातील नागरिकांवर पाणीपट्टी, घरपट्टीच्या माध्यमातून कोणतीही दरवाढ न करता शहराच्या विकासाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केल्याबद्दल समाधान व्यक्त करताना जिल्हा प्रशासन, राज्य शासन, आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडितशेठ पाटील या सर्वांचेच चांगले सहकार्य राहिले असल्याचे विशेष नमूद केले.

एकूण 44 कोटी 76 लाखांचा अलिबाग नगरपरिषदेचा अर्थसंकल्प एकमताने मंजूर करण्यात आला असून या अर्थसंकल्पामुळे शहराच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्‍वास सर्व नगरसेवकांनी व्यक्त केला. सदर अर्थसंकल्पीय सभेस नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या समवेत उपनगराध्यक्षा अ‍ॅड मानसी म्हात्रे, गटनेते प्रदीप नाईक, नगरपरिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद वाकडे, सर्व विषय समित्यांचे सभापती, सर्व नगरसेवक उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.