अधिकार्यांच्या मालमत्तेची चौकशीची मागणी
सिटी बेल लाइव्ह । उरण । घनःश्याम कडू ।
उरण महावितरण विभागाकडून कोणत्याही प्रकारची नोटीस अथवा जनजागृती न करता थकबाकीदार ग्राहकांचे विज कनेक्शन तोडण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. उरण महावितरणचा भोंगळ कारभार या निमित्ताने समोर आला आहे.
नागरिकांच्या मिटरचे रिडींग घेतले जात नाही की, ग्राहकांना विज बिल घरपोच दिले जात नाही. अंदाजे बिल पाठवत बिल न भरणार्यांचे विज कनेक्शन कापले जात आहे. थकबाकीदारांना कायद्याने नोटीस देणे बंधनकारक असतानाही ती न देता अथवा जनजागृती न करता विज पुरवठा खंडीत करण्याची मोहिम उरणमध्ये सुरु आहे. कोणत्याही प्रकारच्या पुर्वसूचना न देता धडक मोहिम हाती घेणार्या या अधिकारी व कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी उरण परिसरातून जोर धरु लागली आहे.
उरणमधील विज खंडीत करण्याच्या मोहिमेमध्ये ज्यांचा कोणी वाली नाही त्यांना फटका बसला आहे. उरणमधील हॉटेल, बार, आईस्क्रीम व इतर दुकाने यांची बिल मात्र नाममात्र येत असल्याची चर्चा आहे. कारण काही वायरमनचा त्यांच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याने ते मिटरमधून विज कनेक्शन डायरेक्ट करुन देत असल्याचा आरोप जनतेतून होत आहे. तसेच काही विज चोरांवर कारवाई करण्यात आली. मात्र त्यातील अनेक विजचोर हे राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच असल्यामुळे त्यांची नावे उघड करण्यास महावितरण अधिकारी जाणुनबुजून टाळाटाळ करीत सर्वसामान्य माणसांची नावे जाहीर करण्यात धन्यता मानतात. काही ठिकाणी डीपीची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे. त्यापासून धोका संभवतो याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. महावितरणाच्या अधिकारी वर्गांनी अशाप्रकारे गैरप्रकार करणार्यांना
पाठिशी घालत मालामाल झाले आहेत. तरी संबंधित अधिकार्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी जनतेकडून केला जात आहे.
महावितरणाचे अभियंता चोंडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी विज तोडणीपूर्वी मोबाईल नंबरवर एसएमएसद्वारे नोटीसा बजावल्या आहेत. विज ग्राहकांची जी यादी येत असते त्या ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येत असल्याचे सांगितले.








Be First to Comment