सिटी बेल लाइव्ह । उरण । घनःश्याम कडू ।
दुबईहून तस्करीमार्गे जेएनपीटी बंदरात आणलेला सुमारे 5 कोटी रुपयांचा सिगारेटसाठा महसुल गुप्तवार्ता संचालनायाच्या अधिकार्यांनी जप्त केला आहे. पुन्हा एकदा जेएनपीटी बंदर हे तस्करांचा अड्डा असल्याचे यावरुन सिद्ध होत आहे.
टाळेबंदीनंतर परदेशी सिगारेटच्या मागणीत मोठी वाढ झाली. त्यामुळे आता दुबईतून मोठ्या प्रमाणात परदेशी सिगारेटची तस्करी करण्यात येत आहेत. गेल्या दोन महिन्यात महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) दोन कोटी सिगारेट जप्त केल्या. त्यांची किंमत 30 कोटी रुपये आहे. शनिवारी न्हावा-शेवा बंदरातून 5 कोटींच्या सिगारेट जप्त करण्यात आल्या.
पाकिटाखाली लपवून परदेशी सिगारेटची तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती महसुल गुप्तवार्ता संचालनालयाला (डीआरआय) मिळाली होती. त्यानुसार न्हावा-शेवा बंदरावरुन एका कंटेनरमधून 21 लाख 60 हजार ‘गुडंग गरम’ सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांची किंमत चार कोटी 75 लाख 20 हजार रुपये आहे.
दुबईवरुन हा माल आला होता. या प्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नसली, तरी महत्त्वाचे पुरावे ‘डीआरआय’च्या हाती लागले आहेत.
आरोपींनी बनावट कागदपत्राच्या साह्याने आयात-निर्यात संकेतांक (कोड) मिळवला होता. त्याच्या साह्याने हा माल दुबईवरुन आणण्यात आला. कोरोना काळात मोठ्या टोळ्या सिगारेट तस्करी करीत आहेत. गेल्या दोन महिन्यात परदेशी सिगारेट तस्करीबाबत मुंबई ‘डीआरआय’ची ही पाचवी कारवाई आहे.
यापूर्वी जत्तीपूर येथे तीन तर न्हावा-शेवा येथे दोन कारवायांद्वारे दोन कोटी सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत. याची किंमत 30 कोटी रुपये आहे. या संपूर्ण प्रकरणात मोठी टोळी सक्रिय असून दुबईवरुन हा माल मुंबईत आणला जातो. त्यासाठी बनावट आयात-निर्यात संकेतांक वापर करण्यात येत आहे. त्यासाठी त्रयस्थ व्यक्तीची कागदपत्रे घेऊन हे संकेतांक मिळवले जात आहेत. त्यानंतर अन्य वस्तूंच्या नावाखाली सिगरेटची तस्करी केली जाते.








Be First to Comment