Press "Enter" to skip to content

शिवकार्य ट्रेकर्सकडून सोंडाई श्रमदान मोहीम फत्ते

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

शिवकालीन ऐतिहासिक वारसा संवर्धनाची भावना आणि सामाजिक बांधिलकी जपत शिवकार्य ट्रेकर्स खालापूर रायगड यांच्यावतीने स्वच्छता व श्रमदान उपक्रम अंतर्गत रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सोंडेवाडी येथील सोंडाई गडाची श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली.

शिवकार्य ट्रेकर्स नेहमीच आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून समाजहिताचे कार्य करत असते. शिवजयंतीचे औचित्य साधून सोंडाई गडावर सूचना फलक, स्वच्छता व श्रमदान उपक्रम राबविण्यात आला.

शिवकार्यचे संस्थापक रोहिदास राघो ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली व शिवकार्य मधील महेश दुर्गे,आकाश गोडीवले,किरण भालेकर,लखन पवार,प्रसाद जाधव,जितेंद्र कदम,बबन झोरे,शरद मालकर,मंदार उतेकर व केतन भद्रीके यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकार्य ट्रेकर्स गेली पाच वर्षे गडकिल्ले संवर्धन करण्यासाठी सातत्याने श्रमदान करीत आहेत.

दरम्यान यावेळी शिवकार्य ट्रेकर्स खालापूरच्या माध्यमातून सोंडाई किल्यावर या वर्षीची ही चौथी मोहीम होती.सकाळच्या सत्रात गडाच्या पायथ्यापासून ते गडावर जाईपर्यंत योग्य जागी दिशादर्शक व सूचना फलक लावण्यात आले.दुपारच्या सत्रात पाण्याच्या टाक्या स्वच्छ करून गडावर येणाऱ्या वाटा व्यवस्थित करून पायथ्यापासून ते वरपर्यंत अस्ताव्यस्त पडलेला संपूर्ण प्लास्टिक कचरा तर मद्याच्या,बिस्लरी बाटल्या एकत्रित करून गडाच्या पायथ्याशी नेण्यात येऊन त्याची विल्हेवाट लावली.

माथेरानच्या डोंगर रांगेत वसलेल्या सोंडाई किल्ल्यावर पर्यटक,ट्रेकर्स यांची संख्या वाढत आहे.गडाच्या पायथ्याशी सोंडेवाडी व वाघेश्वर आणि इतरही गावे आहेत,भविष्यात नक्कीच या सर्व गावांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

पर्यटनाच्या दृष्टीने सोंडाई गड येथे पर्यटक येत असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने स्थळाची सुस्थिती अबाधित राहणे व ऐतिहासिक वारसा संवर्धन करीता हा उपक्रम राबविण्यात आला. गड सुसज्ज राहण्यासाठी स्थानिक शिवप्रेमी सातत्याने संवर्धनाकरिता प्रयत्नशील असून त्यामध्ये शिवकार्य ट्रेकर्स खालापूर दरवर्षी आपला सहभाग दर्शवत असते. सदर श्रमदान व स्वच्छता मोहिमेत शिवकार्य ट्रेकर्सच्या २५ हुन अधिक दुर्गवीरांनी सक्रिय सहभाग घेत जागोजागी सूचना फलक लावून, पाण्याच्या टाकीतील कचरा काढून गडावर येणाऱ्या वाटा व्यवस्थित करून संपूर्ण गड परिसर प्लास्टिक मुक्त करण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.