नवपरिवर्तन संस्थने आदिवासी बांधवाला स्वतःच्या पायावर उभे करून शिवजयंती केली साजरी
सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
रयतेचे राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उरणमधील नवपरिवर्तन संस्थेने शिवजयंती थाटामटात साजरी न करता एका निराधार आदिवासी कुटूंबाला स्वतःच्या पायावर उभे रहाण्यासाठी छोटेसे दुकान उघडून देऊन उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देत साजरी केली. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमा बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. या दुकानाचे उद्घाटन अवघ्या १२ तासात ५ गड विक्रमी वेळेत सर करणारी चिमुरडी हर्षिती भोईर हिच्या हस्ते करण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव गेली वर्षभर सुरू आहे. पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्यापासून वाचण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी शासनाकडून सुरू झाली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या शिवजयंती उत्सवावर संक्रात आली आहे. त्यामुळे राज्यभर नियमांचे काटेकोर पालन करून शिवजयंती साजरी करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
त्या आदेशाचे पालन करीत उरणमधील नवपरिवर्तन संस्थेने नवपरिवर्तन घडविण्याच्या दृष्टीने एका गरीब आदिवासी कुटूंबातील कर्ता पुरुषच आजाराने बेजार असून तो मेहनतीचे कोणतेही काम करण्यास सक्षम नसल्याकारणाने त्या कुटूंबाला एक छोटेसे दुकान थाटून देण्यात आले आहे. जेणेकरून या मिळणाऱ्या उत्पन्नावरून तो आपल्या कुटूंबाची उपजीविका करू शकतो हा यामागचा नवपरिवर्तन संस्थेचा मानस आहे.
संस्थेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या या दुकानाचे उद्घाटन अवघ्या १२ तासांमध्ये ५ गड सर करून, “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड”, “एशिया बुक ऑफ रेकॉर्ड” आणि “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड” मध्ये नोंद झालेली कु.हर्षिती कविराज भोईर हिच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नवपरिवर्तन संस्थेचे सर्व सदस्य व इतर नागरिक, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विरेश मोडखरकर यांनी आपल्या मनोगतात संस्थेचा उद्देश स्पष्ट केला. तर कार्याध्यक्ष डॉ. सत्या ठाकरे यांनीही मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन गावंड सर यांनी केले.








Be First to Comment