शेकाप सरचिटणीस विधानपरिषद सदस्य आ.जयंत पाटील यांनी उपस्थित केला पोलादपूर तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेच्या बळींचा प्रश्न
सिटी बेल लाइव्ह । पोलादपूर । शैलेश पालकर ।
तालुक्यातील पोलादपूर शहरातील सैनिकनगरातील मातामृत्यूसह काळवली गावातील शाळकरी मुलाचा सर्पदंशाने झालेल्या मृत्यूप्रकरणी शेकापनेते विधानपरिषद सदस्य आ.जयंत पाटील यांनी विधान परिषदेमध्ये आगामी अधिवेशन काळात तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रश्नामुळे पोलादपूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असूनही मृतांच्या वारसांना अद्याप कोणत्याही प्रकारचा मोबदला अथवा दिलासा न मिळाल्याने सरकारला वरिष्ठ सभागृहामध्ये तालुक्यातील महत्वाच्या विषयावर उत्तर देताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
बुधवार, दि.09 सप्टेंबर 2020 रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास काळवली येथील प्रतिक प्रमोद महाडिक हा 14 वर्षीय शाळकरी मुलगा घरामध्ये झोपला असता त्याला मण्यार या विषारी सर्पाने दंश केला. यानंतर तातडीने त्याच्या पालकांनी व नातेवाईकांनी त्याला पोलादपूर येथे तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रूग्णालयामध्ये सव्वा एक वाजता उपचारासाठी आणले. मात्र, येथे डॉक्टर आणि योग्य उपचारसुविधा उपलब्ध नसल्याने प्रतिक याला महाड ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले. तेथे त्याच्या उपचार सुरु असताना पहाटेच्या सुमारास प्रतिक याचा दि.09 सप्टेंबर 2020 रोजी दुर्दैवी मृत्यू झाला.
यापूर्वीही पोलादपूर शहरातील सैनिकनगर येथील सोनल संकेत लाड या बाळंतिणीवर पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी महिला डॉक्टरांनी टाळाटाळ करून माणगांव उपजिल्हा रूग्णालयामध्ये आणि नंतर जे.जे. रूग्णालयामध्ये रवाना केल्याने सदर बाळंतिण महिलेचा गेल्या वर्षी दि. 1 डिसेंबर 2019 रोजी मृत्यू ओढवल्याचे प्रकरण विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आ.प्रवीण दरेकर यांनी सभागृहामध्ये मांडले आहे. मात्र, कोरोना काळात विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये पुष्कळशा प्रश्नांचे कार्यअहवाल आणि स्पष्टीकरण देण्याचे टाळण्यात आले. यामुळे मातामृत्यूप्रकरणी पुढे काय झाले, हे गुलदस्त्यात राहिले असताना ऐन कोरोना काळात प्रतिक प्रमोद महाडीक या शाळकरी मुलाला सर्पदंशानंतर मृत्यूला सामोरे जावे लागले.
या दोन्ही घटनांत आरोग्य व्यवस्थेमुळेच जीव गमवावे लागल्याचा जनक्षोभ पोलादपूर तालुक्यात उसळला असताना यासंदर्भात कोरोना लॉकडाऊन काळात जनआंदोलनाचा विचार रहित करण्यात आला. मात्र, यासंदर्भात सप्तक्रोशी काळवली,धारवली, वावे, सवाद, माटवण, कणगुले, हावरे विभागातील योगेश महाडीक, समीर चिपळूणकर, संजय महाडीक, हर्षल सातपुते, यासीन करबेळकर या तरूण कार्यकर्त्यांनी याप्रश्नी निवेदने देऊन लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून घेत पाठपुरावा केला. यावेळी या तरूणांनी शेकापक्षाचे सर्वेसर्वा आ.जयंत पाटील यांनाही निवेदन दिले. या निवेदनाची गांभिर्याने दखल घेत आ.पाटील यांनी आगामी अधिवेशनकाळात तारांकित प्रश्न उपस्थित केल्यामुळे पोलादपूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणेच्या बळींना न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.








Be First to Comment