सिटी बेल लाइव्ह । पोलादपूर । शैलेश पालकर ।
तालुक्यातील पोलादपूर शहरालगतच्या काटेतळी गावाला आर.आर.पाटील सुंदर गांव पुरस्कार रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. रायगड जिल्हा परिषदेच्या स्व.प्रभाकर पाटील सभागृहामध्ये या पुरस्कार वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते.
पोलादपूर तालुक्यातील संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आणि अन्य उपक्रमांमध्ये राज्याच्या पारितोषिकाच्या स्पर्धेत उपविजेतेपदाची मजल मारणाऱ्या काटेतळी ग्रामपंचायतीने 2018-19 या वर्षी राज्यसरकारच्या आर.आर.पाटील सुंदर गांव पुरस्कार स्पर्धेत पोलादपूर तालुक्यात अव्वल गुण संपादन केल्याने या गावाची तालुक्यातून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
हे पारितोषिक प्रदान करताना राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांच्याहस्ते राजिप अध्यक्षा योगिता पारधी, विधानपरिषद सदस्य आ.बाळाराम पाटील, आ.महेंद्र दळवी, आ.महेंद्र थोरवे, राजिप उपाध्यक्ष सुधाकर घारे, सभापती दिलीप भोईर, गीता जाधव, बबन मनवे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पोलादपूर तालुका नायक मराठा सेवा संघाचे अध्यक्ष तथा माजी सरपंच सुनील मोरे यांच्यासह विद्यमान महिला सरपंच नंदा मोरे तसेच ग्रामसेविका शिल्पा कोंढाळकर यांनी काटेतळी ग्रामपंचायतीच्या वतीने पुरस्कार स्विकारला.








Be First to Comment