Press "Enter" to skip to content

स्वच्छतेच्या नवीन सवई अंगिकारल्या पाहिजेत : डॉ. किरण पाटील

अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायती, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र यांना कोरोना विषाणू प्रतिबंध करिता लिक्वीड क्लिनरचे मोफत वाटप

सिटी बेल लाइव्ह । राजेश बाष्टे । अलिबाग ।

कोविड काळात अनेक धडे मिळाले असून, स्वच्छतेच्या नवीन आलेल्या सवई सर्वांनी अंगिकारल्या पाहिजेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी चेंढरे ग्रामपंचायत कार्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात केले.

रेकिट बेन्कीझर कंपनी, सेवा मॉब संस्था व जिल्हा परिषद सदस्या प्रियदर्शनी पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायती, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र यांना कोरोना विषाणू प्रतिबंध करिता लिक्वीड क्लिनरचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. किरण पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

रेकिट बेन्कीझर कंपनीने अलिबाग तालुक्यात कोरोना विषाणू प्रतिबंध करिता लिक्वीड क्लिनर उपलब्ध करून दिले आहे. भविष्यातही त्यांच्याकडून असेच सहकार्य मिळावे. लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतींनी विकास कामांसाठी कंपण्यांपर्यंत पोहचून, त्यांच्याकडून विकासनिधी मिळविण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच गावाचा विकास करताना स्वयंसेवी संस्थांची मदत घ्या, असा सल्ला डॉ. किरण पाटील यांनी दिला. यावेळी चेंढरे ग्रामपंचायतीने आर. आर. पाटील सुंदर गाव स्पर्धेत सहभागी व्हावे. त्या दृष्टीने विकासकामे राबवावीत असे मत मांडले.

यावेळी जिल्हा परिषदेतील शेकाप पक्षप्रतोद ऍड. आस्वाद पाटील, जिल्हा परिषद सदस्या प्रियदर्शनी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, अलिबाग पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, उपसभापती मीनल माळी, गट विकास अधिकारी डॉ. दीप्ती पाटील, चेंढरे ग्रामपंचायत सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच यतीन घरत उपस्थित होते.

रेकिट बेन्कीझर कंपनीने कोरोना विषाणू प्रतिबंध करिता लिक्वीड क्लिनर उपलब्ध करून देत चांगला उपक्रम राबविला आहे. जिल्ह्यातील इतर कंपन्यांनी आपल्या विकास निधीतून असे उपक्रम राबवावेत, जेणेकरून आपण ज्या परिसरात व्यवसाय करतो, आपले कर्मचारी ज्या परिसरात राहतात त्या परिसराला त्याचा लाभ मिळेल.

ऍड. आस्वाद पाटील
शेकाप पक्षप्रतोद, जिल्हा परिषद रायगड

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.