पनवेल तालुका पोलिसांनी अल्पवयीन मुलीस सुखरुपपणे दिले तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात
सिटी बेल लाइव्ह । पनवेल । संजय कदम ।
पनवेल परिसरातील राहत्या घरातून दोन दिवसापासून बेपत्ता झालेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस तालुका पोलिसांनी तात्काळ सुत्रे हलवून तिला वपोनि रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुटुंबियांच्या ताब्यात दिल्यावर तिच्या कुटुंबियांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.
तालुक्यातील खैराटवाडी येथे राहणारी एक 16 वर्षीय अल्पवयीन तरुणी गेल्या दोन दिवसापासून राहत्या घरातून कोणास काही न सांगता कुठेतरी निघून गेल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात देताच वपोनि रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप. निरी. आकाश पवार यांनी सदर तक्रारीवरून तात्काळ दखल घेऊन प्राथमिक चौकशी करता गोपनीय बातमीदाराकडून माहीती मिळाली की, सदर अल्पवयीन मुलगी ही चावणेगाव, रसायनी येथे आहे . तात्काळ पोलीस उपनिरीक्षक आकाश पवार, महिला अंमलदार सुजाता गजे, महेश धुमाळ यांनी तेथे जाऊन अल्पवयीन मुलीचा शोध घेता ती तिचे भावाचा मित्रासोबत मिळून आली.
त्या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन अधिक चौकशी करता, तिने सांगितले की, तिचे भावाने तिला मारल्याने ती रागाचे भरात रसायनी येथे तिच्या भावाचा मित्र याचेकडे स्वतःहून निघुन गेली होती. तिला विश्वासात घेऊन तिच्यासोबत काही गैरप्रकार झाला आहे काय ? याबाबत महिला अमलदारामार्फत चौकशी करण्यात आली परंतु काहीही गैरप्रकार झाला नसल्याचे निष्पन्न झाले . नमूद मुलीचे वडील यांनी त्यांची मुलगी त्यांना सुखरूपपणे परत मिळाल्याने व ती स्वतःहून रागाचे भरात निघुन गेल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांची काही एक तक्रार नाही असे त्यांनी सांगितले.
पोलीसांनी वेळीच कारवाई करून त्यांचे अल्पवयीन मुलीस तात्काळ शोधून सुखरूप त्यांचे ताब्यात दिल्याने त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि रवींद्र दौंडकर, पोलीस उपनिरीक्षक आकाश पवार व त्यांच्या सहकार्यांचे आभार मानले आहेत.







Be First to Comment