सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान ।
निसर्गाने सढळ हस्ते वरदान दिलेले सह्याद्रीच्या कुशीतील टुमदार पर्यटनस्थळ म्हणून सुप्रसिद्ध असलेले माथेरान हे कायमस्वरूपी हरित,स्वच्छ आणि सुंदर राहावे यासाठी प्रामुख्याने इथली स्वच्छता असणे आवश्यक आहे यासाठी माथेरानचे मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या दस्तुरी नाक्यावर टॅक्सी चालकांना त्यांच्या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडील सुका कचरा गोळा करण्यासाठी त्यांना कापडी पिशव्यांच्या वाटपाचा कार्यक्रम माथेरान नगरीच्या उत्तम प्रशासक तथा विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.
यावेळी उप नगराध्यक्ष आकाश चौधरी, कार्यशील नगरसेवक नरेश काळे,राजेंद्र शिंदे, शकील पटेल, स्वच्छता अधिकारी अभिमन्यू येळवंडे आणि टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
नुकताच येथील घाट रस्त्याच्या दुतर्फा साचलेल्या कचऱ्याचे संकलन नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी माथेरान मधील स्थानिकांच्या सहकार्याने केले होते त्यावेळी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा त्याचप्रमाणे काचेच्या बाटल्याचा साठा जमा करण्यात आला होता तरीदेखील या मार्गावर त्याचप्रमाणे दस्तुरी नाक्यावर तेथील व्यावसायिक कचरा टाकत असतात. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना हा सर्व प्रकार किळसवाणा वाटत असून याचा साहजिकच इथल्या पर्यटनावर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे.निदान टॅक्सी मधून येणाऱ्या प्रवाशांना सूचित करून त्यांच्या जवळील कचरा घाटात टाकला जाऊ नये यासाठी प्रत्येक टॅक्सी चालकाला एक कापडी पिशवीचे वाटप दस्तुरी नाक्यावर करण्यात आले आहे.
उपस्थितांना स्वच्छतेबाबतीत नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी अनेक उदाहरणे दिली आहेत तर उप नगराध्यक्ष आकाश चौधरी यांनी सुध्दा तेथील घोडेवाल्याना सूचित केले आहे की केवळ माथेरानवर तुमच्या उदरनिर्वाहाचे साधन अवलंबून आहे त्यामुळे याभागात शक्यतो कचरा टाकू नये ही पूर्वसूचना असून यापुढे जर कुणी इथल्या पर्यावरणाला हानी पोहोचविण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर नगरपरिषदेच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जाईल याची सर्व घोडे व्यावसायिक यांनी नोंद घ्यावी.यातून तेथील व्यावसायिक काहीतरी बोध निश्चितपणे घेऊन माथेरान हे कायमस्वरूपी हरित, सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.








Be First to Comment