Press "Enter" to skip to content

जेएनपीटी परिसरात अनधिकृत पार्किंग माफिया

पार्किंगच्या आजूबाजूला असलेल्या टपर्‍यांवर गुटख्यासह चरस,गांजा, दारूची खुलेआम विक्री

सिटी बेल लाइव्ह । उरण । घनःश्याम कडू ।

जेएनपीटी परिसरातील मोकळ्या जागा काहींनी बळकावून त्याठिकाणी अनधिकृत पार्किंगचा व्यवसाय सुरू आहे. तरी लाखों रुपये कमविणार्‍या पार्किंग माफियांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

जेएनपीटी व इतर बंदरात आयात निर्यातीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने अवजड वाहनांची संख्याही मोठी आहे. अवजड वाहनांना कधी कधी थांबावे लागत असल्याने परिसरातच वास्तव्य करावे लागते. वाहनांसाठी असलेल्या अधिकृत पार्किंगमध्ये दर जास्त असल्याने वाहनचालक अनधिकृत पार्कींगचा लाभ घेणे पसंद करतात. याचाच फायदा उठवत काही माफियांनी कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत पार्किंगचा व्यवसाय सुरू केला आहे.

अरुण, समीर, आशुतोष, सूरज, बाबू, मंगेश आदी अनधिकृत पार्किंग माफियांनी वाहन पार्किंगचा व्यवसाय सुरू केला आहे. अधिकृत पार्किंगपेक्षा यांचा दर कमी आहे. तसेच या माफियांची पगारी नोकर वाहनचालकांना आपल्या पार्किंगमध्ये येण्यासाठी दमदाटी वेळप्रसंगी मारहाण ही करीत असल्याने नाईलाजास्तव आम्ही अनधिकृत पार्किंगमध्ये वाहने उभी करीत असल्याचे वाहनचालक सांगतात.
अनधिकृत पार्किंग बरोबर वाहन चालकांना खाद्यपदार्थ देण्यासाठी
अनधिकृत कॅटिंगची सोया केली जात आहे. तसेच आजूबाजूला असलेल्या टपर्‍यावर गुटखा बंदी असतानाही गुटख्यासह चरस, गांजाची विक्री खुलेआम होत आहे. त्याचबरोबर कॅटिंगमध्ये जेवणा बरोबर गावठी व देशी विदेशी दारूची विक्री कोणतीही भीती न बाळगता सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळते. याला कोणतीही परवानगी नसतानाही विक्री होत आहे. याची सर्व माहिती पोलीस यंत्रणेला असूनही ते ही कारवाई करीत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

याबाबत अनेकवेळा वृत्त प्रसिद्ध होऊन ही जेएनपीटी अथवा पोलीस प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. यावरून अनधिकृत पार्किंग माफिया व जेएनपीटी, पोलीस प्रशासनाचे आर्थिक हितसंबंध असल्यामुळेच कारवाई होण्याऐवजी त्यांना एकप्रकारे अभय देण्याचे काम केले जात असल्याची चर्चा जेएनपीटी परिसरात सुरू आहे. तरी अनधिकृत पार्किंग माफियांवर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी प्रशासनाकडे लवकरच सामाजिक संस्था करणार असल्याचे समजते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.