Press "Enter" to skip to content

उरण तालुक्यातील सरपंच पदाच्या निडणुका संपन्न


चाणजे शिवसेनेचे मंगेश थळी, म्हातवली शेकापच्या रंजना पाटील, फुंडे आघाडीचे सागर घरत, केगाव आघाडीचे नंदकुमार पाटील तर वेश्वि व नागावची निवडणूक स्थगित

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।

उरण तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपन्न झाल्या होत्या. त्या ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुका आज घेण्यात आल्या. त्यामध्ये चाणजे, म्हातवली व केगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. तर फुंडे ग्रामपंचायतीत निडणुक झाली.

निवडणूक कार्यक्रम शांततेत पार पडला.
चाणजे ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी शिवसेनेचे मंगेश थळी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. मात्र उपसरपंच पदासाठी भाजपाचे अशोक कोळी व शिवसेनेच्या मानसी पुरो यांच्यात लढत झाली. त्यामध्ये भाजपाचे अशोक कोळी यांना १२ तर शिवसेनेच्या मानसी पुरो यांना ४ मते मिळाल्याने भाजपाचे अशोक कोळी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

मतदान प्रक्रियेत शिवसेनेची मते फुटल्याचे उघड झाले. तसेच शिवसेनेचे अमित भगत यांची गैरहजेरी चर्चेचा विषय बनली होती.

केगावमध्ये महाविकास आघाडीचे नंदकुमार पाटील यांची सरपंच पदी तर चिंतामण पाटील यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली. म्हातवलीमध्ये शेकाप-भाजपा युती होऊन सरपंच पदी शेकापच्या रंजना पाटील तर उपसरपंच पदी भाजपाच्या पल्लवी म्हात्रे यांची बिनविरोध निवड झाली.

फुंडेमध्ये सरपंच पदासाठी महाविकास आघाडीचे सागर घरत व भाजपचे जयंवती म्हात्रे यांच्यात लढत होऊन आघाडीचे सागर घरत यांना ७ तर भाजपचे जयवंती म्हात्रे यांना २ मते मिळाल्याने सागर घरत यांची सरपंच पदी निवड झाली. तर उपसरपंच पदी भाजपचे कैलास म्हात्रे २ व आघाडीचे चंद्रकांत म्हात्रे यांना ७ मते मिळाल्याने त्यांची उपसरपंच पदी निवड झाली.

नागाव व वेश्वि ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण पडले आहे. ते उमेदवार नसल्याने व हरकत घेतल्याने ही निवडणूक स्थगित ठेऊन ती दि. १६ फेब्रुवारी नंतर घेण्यात येणार असल्याचे तहसिल कार्यालयातून सांगण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.