सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन पुणे व रोहा प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम
अदिती तटकरे, ललिता बाबर, डॉ. शंतनू आठवले, शिवालिका पाटील, मनोज सानप, दत्ताराम महाडिक, भारत रांजणकर यांचा होणार गौरव
सिटी बेल लाइव्ह । धाटाव । शशिकांत मोरे ।
सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पुणे व रोहा प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन केले आहे. येत्या शुक्रवारी (ता.१२) सकाळी ११.३० वाजता ज्येष्ठ नागरिक सभागृह, रोहा, जि. रायगड येथे हा समारंभ होणार आहे, अशी माहिती संयोजक प्रा.सुनील धाडीवाल यांनी दिली.
या सत्कार व पुरस्कार वितरण समारंभासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा शकुंतला काळे प्रमुख अतिथी म्हणून तर रायगडच्या पालकमंत्री अदितीताई तटकरे व सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पुणेचे संस्थापक अध्यक्ष,प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार आणि गांधी अभ्यासकअरुण खोरे असणार आहेत.
समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्त्वांचा ‘सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन सन्मान केला जाणार आहे. शकुंतला काळे व अदितीताई तटकरे यांना ‘सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार’, तर जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप,सुदर्शन केमिकल्सच्या सीएसआर विभागाच्या प्रमुख शिवालिका पाटील,प्रसिद्ध डॉक्टर शंतनू आठवले, तहसीलदार व धावपटू ललिता बाबर, वरिष्ठ पत्रकार भारत रांजणकर,पोलीस अधिकारी दत्ताराम महाडिक यांना ‘सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.
दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत शाळेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा, तसेच त्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या आणि मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने ‘सूर्यदत्ता’तर्फे ‘चला विद्यार्थ्यांच्या गावी’ हा उपक्रम राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत या गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांचे विशेष मार्गदर्शनही लाभणार आहे.








Be First to Comment