रोहिदास कोचिंग क्लासेस व शिवकार्य ट्रेकर्स खालापूर विभागाचा उपक्रम
सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
विद्यार्थी शिक्षण घेत असताना पाठ्यपुस्तक व वर्गाच्या चार भिंतीत अडकून न राहता बाहेरच्या जगाशी जोडलेले असावे असे मत चौकच्या रोहिदास कोचिंग क्लासेसचे संचालक तथा शिवकार्य ट्रेकर्स खालापूर रायगड चे संस्थापक रोहिदास ठोंबरे सरांनी सोंडाई गडावर विद्यार्थ्यांशी बोलताना व्यक्त केले.
रोहिदास कोचिंग क्लासेस व शिवकार्य ट्रेकर्स खालापूर विभागाकडून विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट रायगड जिल्ह्यातील, कर्जत तालुक्यातील सोंडेवाडी येथील सोंडाई किल्ल्यावर आयोजित करण्यात आली होती.
माथेरानच्या डोंगर रांगेत वसलेला हा सोंडाई दुर्ग टेहळणी बुरुज म्हणून सुप्रसिद्ध आहे.या दुर्गाच्या माथ्यावरून माथेरान,इर्शालगड,माणिकगड
कर्नाळा,पेब,कोथलीगड, भिवगड व भीमाशंकरच्या डोंगररांगा अगदी स्पष्टपणे दिसतात.गडावर सोंडाई देवी मातेची मूर्ती आहे असून दरवर्षी दिवाळीत या ठिकाणी मोठा उत्सव भरतो. स्थानिक इतिहासात महत्वाचे स्थान असलेल्या या गडावर वर विद्यार्थ्यांनी दुर्ग भ्रमंती केली.बहुतेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील ही पहिलीच दुर्गभ्रमंती होती म्हणून सर्वांच्या चेहऱ्यावर उत्साह होता.

यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून किल्ल्यावर स्वच्छता मोहीमेचे काय महत्व असते हे समजून घेतले. यावेळी रोहिदास सर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, दुर्गप्रेमी व अनुभवी ट्रेकर्स आपल्या मोहिमांमधून स्वच्छतेची काळजी नेहमीच घेतात. हौशी पर्यटक, सर्वसामान्य लोक मात्र अनेक वेळा आपल्या मागे मोठा कचरा सोडून जातात. पावसाळ्यात धबधब्यांच्या आकर्षणाने अनेक हौशी पर्यटक या डोंगरांकडे वळतात, अनेक वेळा मद्यपींच्या पार्ट्या सुद्धा या स्थळांवर रंगतात. मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा, दारूच्या बाटल्या दिसणे नेहमीचे चित्र असते. या कचऱ्याच्या स्वच्छतेची जवाबदारी उचलणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.गडकिल्ले असो नाहीतर ऐतिहासिक वास्तू असू दे या सर्वांचे रक्षण करणं आपलं आद्य कर्तव्य आहे.म्हणून आपण महाराष्ट्रातील कुठेही किल्यावर गेला असाल तर आपण सोबत आणलेली प्रत्येक वस्तू ती इतरत्र फेकून न देता ती आपल्या बॅग मध्ये भरून घरी आणून त्याची विल्हेवाट लावा.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, सहयाद्री ही आपली ओळख आहे,आणि तिचं रक्षण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. या भेटीत थोड्या प्रमाणात का होईना ही जबाबदारी उचलण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला.गडाच्या पायथ्याशी असलेल्या सोंडेवाडी ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचा नाश्ता क्लासचा माजी विद्यार्थी आणि नुकताच पॉवरलिप्ट स्पर्धेत देशातून पहिल्या आलेल्या बबन झोरे यांनी केला.

आपल्या परिसराचा समृद्ध वारसा समजून घेताना निसर्गाचा आस्वाद घ्यायला मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या. या उपक्रमात रोहिदास क्लासेस चे संचालक तथा शिवकार्य ट्रेकर्स चे संस्थापक रोहिदास ठोंबरे, प्राध्यापिका रसिका ठोंबरे, सानिका भोईर, कशीश पवार, प्रीती लबडे,अर्पिता पाटील, मनस्वी मते,पूर्वा आगीवले,विशाखा ठाकूर, अनुष्का कोकंबे,अथर्व पवार,कुणाल शितकणगे,ऋषीकेश लबडे,आर्यन पाटील या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी बबन झोरे व मंगेश गरुडे यांनी विशेष मेहनत घेतली.








Be First to Comment