Press "Enter" to skip to content

पागोटे सरपंच अविश्वास ठरावाच्या बाजूने 493 तर विरोधात 376 मतदान

पागोटे सरपंच अ‍ॅड.भार्गव पाटील यांच्यावरील अविश्वास ठराव ग्रामसभेत मंजूर

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।

पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच अ‍ॅड. भार्गव पाटील यांच्यावरील अविश्‍वास ठराव सदस्यांनी मंजूर केला होता. त्यानंतर आज विशेष ग्रामसभा बोलावून त्यात मतदान घेतल्यानंतर ग्रामस्थांनी ही अविश्‍वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने सरपंच अ‍ॅड. भार्गव पाटील यांच्यावरील अविश्‍वास ठरावावर सदस्यांसह ग्रामस्थांनी ही शिक्कामोर्तब केला आहे.

अविश्‍वास ठरावाच्या बाजूने 493 तर विरोधात 376 मतदान झाले.
पागोटे ग्रामपंचायतीत सरपंच भार्गव दामाजी पाटील, उपसरपंच सुमित चंद्रकांत पाटील, सदस्य मिलिंद केशव तांडेल, हर्षाली निलेश पाटील, मिता किरण पंडित, कामिनी किरण तांडेल, वनिता जगदीश पाटील, रश्मी राकेश म्हात्रे, प्रदिप गोसावी पाटील, समिर दयाराम पाटील असे एकूण सरपंचासह 10 सदस्यांचे संख्याबल आहे.

सरपंच अ‍ॅड. भार्गव पाटील यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्‍वास ठराव दाखल केला होता. त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी गुप्त मतदान घेतले होते. त्यानुसार सरपंच 1 व सदस्य 9 असे 10 जणांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला होता. यावेळी अविश्‍वास ठरावाच्या बाजूने 8 तर अविश्‍वास ठरावाच्या विरोधात सरपंच व 1 सदस्य अशी 2 मते मिळाल्याने अविश्‍वास ठराव मंजूर झाला होता.

सरपंच पदाची निवडणूक जनतेतून झाल्याने जरी सदस्यांनी सरपंचावरील अविश्‍वास ठराव मंजूर केला तरी पुन्हा ग्रामस्थांनी ही त्यास मंजुरी देणे आवश्यक असते. यामुळेच आज विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर ग्रामसभा जिप शाळा मराठी शाळेत आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी निवासी नायब तहसीलदार संदीप खोमणे व इतर कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत अविश्‍वास ठराव मंजुरीसाठी मतदानास टाकण्यात आला.

यावेळी एकूण ग्रामस्थ 1206 उपस्थित होते. त्यातील 909 जणांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला होता. त्यातील अविश्वास ठरावाच्या बाजूने 493 मते तर अविश्‍वास ठरावाच्या विरोधात 376 मतदान झाले. तर 40 मतदान बाद झाले. यामध्ये अविश्‍वास ठरावाच्या बाजूने सर्वाधिक म्हणजे 493 मतदान झाल्याने ग्रामसभेत सरपंच अ‍ॅड. भार्गव पाटील यांच्यावरील अविश्‍वास ठराव मंजूर झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी नायब तहसीलदार संदीप खोमणे यांनी दिला. यामुळे अखेर आज सरपंचावरील अविश्‍वास ठरावावर शिक्कामोर्तब झाला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.