सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
सन १९९० पासून जेएनपीटी वसाहतीमध्ये गेली ३० वर्षे दर्जेदार शिक्षण देऊन हजारो विद्यार्थी घडविणाऱ्या आणि अजूनही शासकीय नियमाने आय ई एस संस्थेत कार्यरत असणाऱ्या ११४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर नोटिसा पाठवून कामावरून काढून टाकण्याचे अतिशय अत्याचारी व भयानक कृत्य आर के एफ प्रशासनाने चालविले असून सेवेत कायम असणाऱ्या कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावण्याचे कटकारस्थान केले आहे.
आर के एफ संस्था १ जुलै २०१९ पासून जेएनपीटी विद्यालयाचा कारभार अनाधिकृतपणे चालवीत असून मुंबई उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने न्याय देऊन ११४ लोकांच्या नोकऱ्या कायम केल्या होत्या व शासकीय नियमानुसार वेतन देण्याचे आदेश देऊनही या संस्थेने न्यायालयाचा अवमान करून कर्मचाऱ्यांवर अन्याय चालविला आहे. तरी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी शिक्षकांनी व पालकांनी केली आहे.
जेएनपीटी प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहून आर के एफ प्रशासनाला वारंवार सांगितले होते की आपण न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे. त्याप्रमाणेच तुम्ही कार्यवाही करावी. कर्मचाऱ्यांची सेवा कायम ठेवून त्यांना शासकीय नियमानुसारच वेतन द्यावे. पण आर के एफ प्रशासनाने याबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. आर के एफ प्रशासनाने दि. १७/२/२०१२ च्या जीआर नुसार शासकीय नियमानुसार हस्तांतरणाची प्रक्रिया अजूनही पूर्ण केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.
पालकांमध्ये आपल्या पाल्यांच्या शिक्षणाबाबत चिंतेचे वातावरण पसरले आहे तर कर्मचाऱ्यांमध्ये नोकरीवरून काढून टाकल्यामुळे आर के एफ प्रशासनाच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज जेएनपीटी शाळेच्या गेटवर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने एकत्र जमून आर के एफ प्रशासनाचा निषेध करून थेट न्हावा शेवा पोलीस ठाण्यात धाव घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्यासमोर आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचत आर. के. एफ. प्रशासनावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी कामगारनेते संतोष पवार, संदीप पाटील, नरसु पाटील, रमाकांत गावंड, मिलिंद ठाकूर, तांबोटकर मॅडम आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग उपस्थित होते







Be First to Comment