सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
उरण तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंच व उपसरपंच पदाचा निवड येत्या बुधवार १० फेब्रुवारीला होणार असल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले.
उरण तालुक्यातील वेश्वि, चाणजे, फुंडे, केगाव, नागाव व म्हातवली या ६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच सपन्न झाल्या आहेत. परंतु सरपंच व उपसरपंच पदाची निवड होणे बाकी आहे. त्यामुळे नक्की कोणाची सत्ता आली हे अजून समजत नाही.
तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीचे निवडणूक निकाल लागले असून सत्तेसाठीची गणिते जमविताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. यातील काही ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे. त्यामुळे त्या ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकवावा यासाठी राजकीय नेत्यांनी सदस्यांवर बोली लावण्यास सुरुवात केली आहे. २० ते २५ लाखापासून सदस्यांची बोली सुरू असल्याची चर्चा उरणमध्ये सुरू आहे.
राजकीय नेतेमंडळी आपले अस्तित्व अबाधित राखण्यासाठी सदस्यांची फोडाफोडी करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी आर्थिक रसद पुरविण्याची ही तयारी असल्याचे समजते. कारण ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाचे चिन्ह नसल्याने कोणत्या पक्षाचा सदस्य निवडून आला आहे हे समजत नाही. त्यामुळे सध्या तरी सदस्यांचा घोडेबाजार तेजीत सुरू असल्याचे बोलले जाते.
परंतु ग्रामपंचायतीवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकतो हे बुधवार दि. १० फेब्रुवारी रोजी समजेल तोपर्यंत वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे सरपंच व उपसरपंच पदाची निवड होईपर्यंत सदस्यांना सांभाळण्याची कसरत राजकीय पक्षाचे नेतेमंडळी व पदाधिकाऱ्यांना करावी लागणार आहे.








Be First to Comment