सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित कर्जत नगरपरिषद हद्दीतील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सहा गुणवंतांचा तर कोव्हिड काळात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कोव्हिड योध्यांचा नगरपरिषदेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर नगरपरिषदेच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, बांधकाम सभापती विवेक दांडेकर, पाणी पुरवठा सभापती बळवंत घुमरे, महिला बालकल्याण सभापती प्राची डेरवणकर, महिला बालकल्याण उपसभापती संचिता पाटील, नगरसेविका व नगरसेवक उपस्थित होते.
शैक्षणिक क्षेत्रात – सर्वोत्कृष्ट पीएचडी प्रबंधाच्या पारितोषिकासाठी मुंबई विद्यापीठाचे प्रा.अ.का.प्रायोळकर स्मृती पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉ. नितीन आरेकर, युवा इतिहासकार – सागर मधुकर सुर्वे, जागतिक कीर्तीचे चित्रकार – पराग बोरसे, कवी, अभिनेता, लेखक, साहित्यिक – राहुल वैद्य, बालचित्रकार – दीप रविंद्र भोईर, रोलर स्केटिंग मध्ये लिमका बुक रेकॉर्डचा विजेता – आर्य विकास लाड या सहा जणांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कोरोना महामारीत संपूर्ण जग, देश लॉक डाऊन होता, मात्र अत्यावश्यक सेवेत आपल्या जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी व कर्मचारी, कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व कर्मचारी, उपजिल्हा रुग्णालयातील अधिक्षक व कर्मचारी, अभिनव ज्ञान मंदिर मुख्याध्यापक व कर्मचारी, डॉक्टर संघटनेच्या अध्यक्ष व डॉक्टर, मेडिकल स्टोअर्स अध्यक्ष व सदस्य, पॅथोलॉजी संघटना अध्यक्ष व सदस्य, रोटरी क्लब अध्यक्ष, जैन संघटना अध्यक्ष, सार्वजनिक गणेश मंडळाचे रुग्णवाहिका चालक निलेश (बाली)परदेशी आणि मंडळाचे सदस्य, प्रेस क्लबचे ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे, संजय गायकवाड युट्यूब चे बाळू गुरव, आणि कोरोना काळात महत्वाची भूमिका बजावणारे नगरपरिषदेचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी, सफाई कर्मचारी या सर्वांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
‘कर्जत नगर परिषद अंतर्गत कोव्हिड साथीच्या काळात आपण कर्तव्यनिष्ठ राहून आपल्या जिवाची पर्वा न करता सामाजिक भान ठेवून समाजासाठी करत असलेले कार्य प्रशंसनीय आहे आपल्या अमूल्य सेवेला सलाम करत आपणास व योद्धा म्हणून प्रजासत्तक दिनाच्या पर्वावर कर्जत नगरपरिषदेच्या वतीने सन्मानित करण्यात करीत आहोत’ असे लिखित स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

गुणवंत सन्मान मूर्ती डॉ. नितीन आरेकर म्हणाले आपल्या गावात जन्मलो त्याच गावात आपला सन्मान म्हणजे पाठीवर कौतुकाची थाप आहे, या थाप मुळे अधिक ऊर्जा, बळ मिळेल असे सांगितले. नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी कर्जत मधील गुणवंतांचा सत्कार म्हणजे कर्जत नगरपरिषदेला आणि कर्जतकरांना अभिमानाची बाब आहे, कोरोना महामारीत नगरपरिषदेचे सफाई कामगार, कर्मचारी यांच्या सह अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या विविध कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी यांनी जे काम केले आहे ते कौतुकास्पद आहे, अश्यांना कोव्हिड योद्धा म्हणून सन्मानित करतांना आनंद होत आहे, आपण सर्वांच्या टीम वर्क मुळेच कोरोना महामारीला आपण नियंत्रित ठेवू शकलो असे सांगितले.
यावेळी मोहन ठोसर, वसंत सुर्वे, केतन जोशी, माजी नगरसेवक संतोष पाटील, भालचंद्र जोशी, मधुकर सुर्वे, दत्ता म्हसे, दामोदर शहासने, रमेश खैरे, रजनी गायकवाड, प्रशांत उगले आदी कर्जतकर उपस्थित होते.








Be First to Comment