Press "Enter" to skip to content

कर्जत तालुक्यात कोविशील्ड लसीकरणाचा आमदार महेंद्र थोरवेंच्या हस्ते शुभारंभ

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।

केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे आज दि.25 जानेवारी रोजी शासकीय उपजिल्हा रुग्णालय, कर्जत येथे “कोविशील्ड” लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. मनोज बनसोडे, पंचायत समिती गटविकास अधिकारी बालाजी पुरी, सहाय्यक गटविकास अधिकारी, सी. एम.राजपूत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी. के. मोरे, वैद्यकीय अधिकारी नरहरी फड, डॉ. आकाश गोरे, डॉ. वसंत भालशंकर, डॉ. गणेश मेंगाळ, डॉ. अक्षय पर्जणे, नगरसेवक संकेत भासे, शिवसेना युवा नेते पंकज पाटील जिल्हा रुग्णालयातील इतर वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

प्रारंभी “कोविशील्ड” लसीकरण केंद्राचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते फित कापून आणि कशेळे येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. विक्रांत खंदाडे यांना प्रथम लस टोचुन कोविशील्ड लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली.
तालुक्यात कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पहिल्या टप्प्यात केंद्राच्या माध्यमातून आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविशील्ड लस दिली जाणार आहे. तालुक्यात कोविशील्ड लसीकरण मोहिमेसाठी 1 हजार लसीचे डोस प्राप्त झाल्या आहेत. पहिला डोस घेतल्यानंतर 1 महिन्यानंतर त्याच व्यक्तीला दुसरा डोस देण्यात येणार आहे.

यासाठी सिरम इन्स्टिटयूटने तयार केलेली कोव्हीशिल्ड लस आपल्याकडे आली असल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज बनसोडे यांनी सांगितले.आज 100 आरोग्य कर्मचारी यांना ही लस देण्यात येणार आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रथम प्राधान्याने आरोग्य कर्मचा-यांना लस देण्यात येणार आहे. कोव्हिड केंद्रातील अधिपरिचारिका मनिषा बागुल यांनी डॉ. विक्रात खंदाडे यांना ही लस टोचली, त्यांच्या सहकारी म्हणून सारिका मोकल, रेश्मा बाबरे, अविशा मालकर आणि योगिता पाटील काम करीत आहेत.

आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयात हे लसीकरण केंद्र सुरू होत आहे ही आपल्या तालुक्याला अभिमानास्पद गोष्ट आहे, कोरोना वरील लस म्हणजे 21 व्या शतकातील संजीवनी आहे,असे सांगून लस घेतल्यावर सुद्धा सोशलडिस्टन, मास्क लावणे, नेहमीच हात धुणे आदी शासनाने ठरवून दिलेले नियमांचे पालन करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे असे सांगितले. यावेळी आरोग्य कर्मचारी , नागरिक उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.