Press "Enter" to skip to content

रोह्यात युवकांनी केले डॉ.चिंतामणराव देशमुखांच्या कार्यावर विचारमंथन

वाचन संस्कृतीतून जीवनमान शैली समृद्ध करता येते : प्रांताधिकारी यशवंतराव माने

सिटी बेल लाइव्ह । धाटाव । शशिकांत मोरे ।

     संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी केंद्रीय अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देणारे रोहयाचे सुपुत्र स्व. डॉ. चिंतामणराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंती निमित्त रोहा शहरातील राम मारूती चौकात तालुक्यातील विविध युवक संस्थांच्या संयुक्त सहभागातुन आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत युवा शक्तीने विविध विषयांवरिल परखड मतप्रदर्शना बरोबरच डॉ. सी डी देशमुखांच्या अजरामर कार्याची उजळणी केली. यावेळी वाचन संस्कृतीतून जीवनमान शैली समृद्ध करता येते असल्याचे मत रोहयाचे प्रांताधिकारी यशवंतराव माने यांनी व्यक्त केले.

     रोहा तालुक्यातील सुराज्य प्रतिष्ठान, शिवचरण मित्रमंडळ, स्पंदन नाट्य संस्था, मावळा प्रतिष्ठान, राजमुद्रा फौंडेशन, श्रीकृपा फाउंडेशन, रोटरी क्लब, अभिनव रोहा, रोट्रैक क्लब, रोहा युवा आदी युवा संस्थांच्या सहयोगातुंन रोहा प्रेस क्लब आणि रोहा तालुका युथ फोरमच्या वतीने ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत खुल्या गटात प्रिया जंगम प्रथम, सूरज म्हशेलकर द्वितीय, समीक्षा म्हात्रे तृतीय, व पूर्वा चव्हाण हिने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले तर लहान गटात श्रावणी यादव प्रथम,श्रवण कदम द्वितीय, संस्कृती शिंदे तृतीय, तर सायली घोसाळकर हिने उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले

    अल्पावधित आयोजन करण्यात आलेल्या या स्पर्धेत १७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अभ्यासू व्यक्तिमत्व अमित गूजर व युवा वक्त्या अमृता गोडबोले यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रांत यशवंतराव माने, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, पोलिस निरिक्षक नामदेव बंडगर,ज्येष्ठ वकील सुनिल सानप, सिटिझन फोरमचे निमंत्रक आप्पा देशमुख, धाविर देवस्थान ट्रस्टचे मकरंद बारटके, सभापती महेंद्र दिवेकर,अहमद दर्जी,महेंद्र गूजर,मिलिंद अश्ठिवकर यांच्या हस्ते करण्यात आले.तर आमदार अनिकेत तटकरे यांनीही कार्यक्रमाला  उपस्थिती लावली होती.या कार्यक्रमाचे औचित्य साधून रोहयातिल कोरोना योद्धा राजेश काफरे आणि आदित्य कोंडाळकर यांचा यथोचित सन्मान आमदार अनिकेत तटकरे, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांच्या हस्ते करण्यात आला.

     यावेळी मनोगत व्यक्त करताना वाचन, चिंतन, मनन हे व्यक्तिमत्त्व घडविण्याचे प्रमुख अंग आहे, वाचन संस्कृतीतून जीवनमान शैली समृद्ध करता येते. वक्तृत्व स्पर्धांतून व्यक्तिमत्त्व विकासाची जडणघडण होते, त्यामुळे अशा स्पर्धा भरविल्या पाहिजेत, ते कृतीशील काम रोहा प्रेस क्लब, युथ फोरमच्या अनेक संस्थांच्या सहभागातून होत आहे, एक प्रशासनाचा प्रतिनिधी म्हणून आमचाही अशा उपक्रमात सहभाग राहील, असे मार्गदर्शन प्रांताधिकारी डॉ. यशवंतराव माने यांनी यावेळी केले.

    यावेळी मनोगतात रोहयाचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी शहर सौंदर्यासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे सांगताना आपलं गावं, आपलं शहर कायम स्वच्छ, सुंदर रहावे, हे प्रत्येकासह लोकप्रतिनिधींना वाटत असते. स्वच्छ शहर भुमिकेत नगराध्यक्ष नात्याने माझीही जबाबदारी आहे. पण अमूक काम प्रशासनाचे, शासनाचे आहे, असे नाही.शहर स्वच्छ,सौंदर्यासाठी लोकसहभागही तितकेच महत्वाचे आहे असे सांगत रोह्याचे सुपूत्र डॉ. चिंतामणराव देशमुख यांच्या जयंती निमित्ताने रोहा प्रेस क्लब, युथ फोरमच्या आयोजित वक्तृत्व स्पर्धेतून सजग नागरिक, समाजशील युवा नेतृत्व तयार होतील असे मौलिक विचार नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी व्यक्त केले.

     वक्तृत्त्व स्पर्धेंचे आयोजन करून युवकांच्या संवेदनांना वैचारिक दिशा देण्याचे काम केले असून यामुळे युवकांना व्यक्त होण्यासाठी सध्याच्या समाजमाध्यमांच्या पेक्षाही अधिक परिणामकारक माध्यम उपलब्ध झाल्याचे उद्गार यावेळी यशवंतराव माने यांनी काढले. समाजात घडत असलेल्या घटनांकडे युवा पिढी कोणत्या दृष्टीने पहात आहे किंवा सुदृढ समाजाची गरज म्हणून त्यांनी कोणता दृष्टिकान जपणे गरजेचे आहे याचे मार्गदर्शन या स्पर्धेतून होत असल्याचे मत रोहा प्रांत यशवंतराव माने यांनी व्यक्त केले.तर पोलिस निरिक्षक नामदंव बंडगर यांनी समाजातील चालू घडामोडींवर आधारित विषय घेऊन आयोजित समाजाच्या ताज्या संवेदना जाणून घेण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असून यामुळे समाजाचे विचार प्रवाह मतप्रवाह लक्षात येणे सोपे होत असल्याचे सांगितले. एनकाऊंटर व महिला सुरक्षितता या विषयांबाबतची पोलिस प्रशासनाची भूमिकाही त्यांनी सविस्तर मांडली.

यावेळी तरूण पिढीला डॉ. चिंतामणराव देशमुखांच्या कार्याची, त्यांच्या गुणांची व त्यांच्यापासून घ्यावयाच्या आदर्श विचारांची ओळख व्हावी या उद्देशाने युवा वक्त्यांनी विचार मांडले. वक्तृत्व स्पर्धेत युवा शक्तीने विविध विषयांवरिल परखड मतप्रदर्शना बरोबरच डॉ. सी. डी.देशमुखांच्या कार्यावर विचारमंथन केले. अक्षता शेडगे यांनी सूत्रसंचालन केले तर स्पर्धा समिती प्रमुख राजेंद्र जाधव यांनी आभार मानले.

     स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रोहा प्रेस क्लब अध्यक्ष शशिकांत मोरे, सरचिटणिस नंदकुमार मरवडे, खजिनदार विश्वजीत लुमण, स्पर्धा समिती प्रमुख विनित वाकडे, रोशन चाफेकर, हाजी कोठारी, मयुर धनावडे,अँड.हर्षद साळवी,अमित कासट,उमेश वैष्णव, सिद्देश ममाले, किरण कानडे, प्रतिक राक्षे, चेतन कोरपे, वैभव आठवले, समीर पेणकर, दिनेश जाधव, सिद्देश खटावकर, ऋतुराज अष्टीवकर आदींनी परिश्रम घेतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.