माथेरानच्या ऑलिंपिया मैदानाला मिळणार नवा लूक !
सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान ।
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जवळपास सव्वा शतकानंतर नूतनिकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या अन रायगड जिल्ह्यातील एक सुंदर क्रिकेटचे मैदान म्हणून जिल्ह्यात ख्याती असणाऱ्या माथेरान मधील वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुल(ऑलिंपिया रेसकोर्स ग्राउंडची ) नुकताच नव्या उगमाकडे वाटचाल सुरू झाली आहे.
अनेक नामवंत क्रिकेटचे खेळाडू याच मैदानावर येऊन आपले भवितव्य आजमावत असतात.या मैदानाचे नूतनीकरण व्हावे जेणेकरून क्रीडा प्रेमींना तसेच खेळाडूंना आपल्यातील कलागुणांना वाव देता येईल यासाठी भरीव निधीची तरतूद असावी याकामी विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा सावंत आणि नगरपरिषद गटनेते तथा बांधकाम सभापती प्रसाद सावंत यांनी वारंवार वरिष्ठांना पत्रव्यवहार केला होता.
त्यावेळेस शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी ३० मार्च २०१८ मध्ये माथेरान भेटी दरम्यान या मैदानाची पाहणी करून यासाठी नगरपरिषदेच्या वतीने प्रस्ताव तयार करण्यास सांगितल्यावरून पुढील कामास नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी वेग दिला आणि २९ नोव्हेंबर २०१९ मध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि प्रथमतः माथेरानला प्राधान्य देत रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २५ कोटी रुपये आणि ऑलिंपिया मैदानाच्या नूतनिकरणासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

त्यानुसार सध्या या मैदानाच्या सुशोभीकरणासाठी युद्धपातळीवर कामे सुरू असून पहिल्या टप्प्यात संपूर्ण कंपाऊंड हे जांभ्या दगडात पूर्ण करण्यात येत आहेत तर आणि जुन्याच हेरिटेज प्रमाणे पत्र्यांची तसेच अन्य डागडुजीची कामे केली जात आहेत.तर दुसऱ्या टप्प्यात बसण्याची आसन व्यवस्था आणि गार्डन, लाईटची कामे पूर्ण केली जाणार आहेत.
एकंदरीतच या मैदानाला जे गतवैभव प्राप्त होताना दिसून येत आहे यात प्रामुख्याने राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय हॉकी, फुटबॉल तसेच क्रिकेटचे सामने खेळविले जातील.राज्य तसेच जिल्ह्यातील खेळाडू इथे निदान पंधरा दिवस तरी सरावासाठी येऊ शकतात त्यामुळे निश्चितच हे मैदान एक स्पोर्ट्स टुरिझम झाल्यानंतर आपोआपच इथे पर्यटन वाढून सर्वांना चांगल्या प्रकारे व्यवसाय उपलब्ध होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. समुद्रसपाटीपासून जवळजवळ २८०० फूट उंचीवर येऊन खेळातून पर्यटन आणि पर्यटनातून रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. येणाऱ्या आगामी काळात नक्कीच हे मैदान पर्यटकांचे आकर्षण आणि एक नवीन सुंदर पॉईंट नावारूपाला येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे गटनेते प्रसाद सावंत यांनी सांगितले.
माथेरानकरांसह पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरणार असून क्रीडा प्रेमींसाठी पुन्हा नव्या जोमाने प्रगतीकडे जात असणारे हे मैदान म्हणजे एक पर्वणीच ठरणार आहे.
माथेरान मधील ओलम्पिया ग्राऊंड हे गेली कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित होते, ओलम्पिया ग्राऊंडचे सुशोभीकरण सद्या चालू आहे त्यामुळे आम्हा माथेरान क्रिकेटर्स मध्ये समाधानाचे वातावरण असून , भविष्यात ह्या ओलम्पिया ग्राऊंडला अनेक क्रिकेटर्स आणि पर्यटक आवर्जून भेट देतील त्यामुळे माथेरानच्या पर्यटना मध्ये निश्चितच वाढ होईल.
सागर पाटील, टेनिस क्रिकेटर माथेरान








Be First to Comment