सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांचे
नाव द्यावे या मागणीसाठी लक्षवेधी धरणे आंदोलन सिडको भवन बेलापूर येथे आयोजित केले होते.
यावेळी जेएनपीटी विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील यांनी एक दिवसाचे सकाळी १० ते सायंकाळी ५.३० पर्यंत लाक्षणिक उपोषण केले. महाराष्ट्र शासनाने सिडकोचे माध्यमातून ९५गावची जमीन कवडीमोल किंमतीत घेतली.त्यामुळे सिडको प्रकल्पग्रस्त जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी दि.बा. पाटील यांनी सातत्य पूर्ण लढा केला आहे.

आज त्यांच्या येथील संघर्षातून प्रकल्पग्रस्तांच्या काही मागण्या पूर्ण होऊ शकल्या आहेत. १२.५ टक्के विकसित भूखंड मिळाले. ते बहुजनांचे नेते होते. मंडळ आयोगाच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी संघर्ष केला आहे. या परिसरात शिक्षणाचे महत्त्व पटवून देत रयत शिक्षण संस्थेच्या शाळा कॉलेज उभारणी मध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.
प्रकल्पग्रस्तांचे दि.बा.पाटील आधारस्तंभ होते. त्यांचे नाव चिरकाल टीकून राहाण्यासाठी नवी मुंबईत निर्माण होत असलेल्या नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देणेच उचित ठरेल. येथील प्रकल्पग्रस्त जनतेची ही मागणी आहे. याची नोंद सिडकोने , महाराष्ट्र शासनाने, केंद्र सरकारने घ्यावी यासाठी कॉम्रेड भूषण पाटील यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.
यावेळी विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी, नेतृत्वदायी मंडळींनी उपस्थित राहून या नावाचे समर्थन केले आहे.









Be First to Comment