Press "Enter" to skip to content

ऐनघर ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्र.२ मध्ये अटीतटीची लढत

गावाच्या विकासासाठीच निवडणूक रिंगणात उतरल्याचे दोन्ही पॅनलच्या उमेदवारांचा दावा

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।

नागोठणे विभागात ऐनघर, पळस, कोंडगाव व वरवठणे या चार ग्रामपंचायत निवडणुका होत असल्या तरी ऐनघर ग्रामपंचायत हद्दितील सुकेळी येथील जिंदाल समुहाच्या अनेक कंपन्यांमुळे सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या ऐनघर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण नागोठणे विभागाचे लक्ष लागले आहे.

ऐनघर ग्रामपंचायती मध्ये प्रभाग क्रमांक दोन ( बाळसई, कानसई, कानसई आदिवासी वाडी व जिंदाल हॉस्पिटल मागील कॉलनी ) मधून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेकाप तीन पक्षाच्या आघाडीच्या बाळसई-कानसई ग्रामविकास आघाडीच्या विरोधात सर्वांगीण ग्रामविकास आघाडी अशी अटीतटीची लढत होणार आहे. गावाच्या व संपूर्ण प्रभागाच्या विकासासाठीच निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचा प्रचार दोन्ही पॅनलच्या उमेदवारांकडून करण्यात येत आहे. दरम्यान आम्ही निवडणूक लढविण्याचा निर्णय गाव बैठकीत घेतला असून बाळसई गावाने आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला असल्यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा बाळसई कानसई ग्रामविकास आघाडीचे सर्वेसर्वो मधुकर ठमके यांनी व्यक्त केला आहे.

तर सर्वांगीण ग्रामविकास आघाडीचे कार्यकर्ते अॅड. संदीप जाधव प्रतिक्रिया देतांना म्हणाले की, मतदान हा आपल्याला लोकशाहीने दिलेला अधिकार असुन योग्य उमेदवाराला मतदान करुन आपण तो निर्भिडपणे बजावला पाहिजे. त्यासाठी मतदारांनी आपल्या सर्वांगीण ग्रामविकास आघाडीच्या नव्या दमाच्या तीनही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देऊन त्यांना संधी दिली तर ते विकासकामांच्या माध्यमातून आपल्या संधीचे नक्कीच सोने करतील असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला.

ऐनघर ग्रामपंचायतीच्या या प्रभाग क्रमांक दोन मध्ये बाळसई मध्ये ६५० मते, कानसई मध्ये ३५० मते व जिंदाल कॉलनीत १५० मते असून यामध्ये कानसई आदिवासी वाडीतील काही मते रोजदांरीसाठी बाहेर गावी आहेत. तसेच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिंदाल कॉलनीतीलही बरेचसे परप्रांतीय मतदार त्यांच्या गावी गेले असल्यामुळे ज्या उमेदवारांना बाळसई गावाची साथ असेल तेच उमेदवार प्रभाग क्रमांक दोन मधून निवडून येतील अशी परिस्थिती सद्य स्थितीत निर्माण झाली आहे.

प्रभाग क्रमांक दोन मध्ये बाळसई-कानसई ग्रामविकास आघाडीचे उमेदवार दिनेश धोंडू जाधव, रोशन राजू तेलंगे, अर्चना सचिन भोसले व सर्वांगीण ग्रामविकास आघाडीचे उमेदवार किशोर दयाराम नावले, प्रज्ञा शंकर हरपाल, प्रज्वली भरत भोईर यांच्यात थेट लढत होत असून यातील विजयी उमेदवार कोण ? हे येत्या १८ तारखेलाच समजणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.