कुंचल्यातून साकारले माथेरानच्या राजकीय पटलावरील मुख्य केंद्रबिंदू प्रसादभाई सावंतांचे चित्र
सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान ।
चित्रावरून चरित्राची ओळख निर्माण होत असते आणि याच चरित्रावरून चरित्रात्मक अंगीकृत असणारी संपूर्ण जीवनशैली आणि त्या व्यक्तीचा जीवनपट सुध्दा आपसूकच नजरेसमोर रेखांकित होत असतो.याच धर्तीवर पेणचे सुप्रसिद्ध चित्रकार जितेंद्र (जितू ) चंद्रकांत गायकवाड ज्यांनी अनेक पारितोषिक चित्रकारिता क्षेत्रांत नैपुण्यपूर्वक कामगिरी करून पटकावली आहेत.त्यांच्या अद्वितीय आणि अदभूत कलेला दाद परदेशात सुध्दा मिळालेली असून अनेक परदेशी व्यक्तींच्या मागणीनुसार आणि आवडीप्रमाणे अनेक पेंटिंग (चित्रे)आपल्या कुंचल्यातून रेखाटून दिली आहेत.
मूळचे पेण (रायगड) येथील जितू गायकवाड यांनी हृषीकेश चित्रकला महाविद्यालय पनवेल येथे चित्रकलेचे धडे गिरवले असून जे.जे. स्कुल ऑफ आर्ट मध्ये डिग्री घेतली आहे. आतापर्यंत त्यांनी एकूण ३२ वेळा वैयक्तिक आणि समूह चित्रप्रदर्शनमुंबई पुण्यासारख्या नामवंत गॅलरीत भरविले असून चित्र प्रेमींकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आहे.
माथेरान वर विशेषतः प्रेम असणारे जितू यांनी नुकताच येथील नगरपरिषदेचे गटनेते तथा बांधकाम सभापती प्रसादभाई सावंत यांचे हुबेहूब चित्र रेखाटून प्रसादभाई सावंत यांना भेट स्वरूपात दिले आहे. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, माथेरान मधल्या आजवरच्या राजकीय घडामोडीत उल्लेखनीय कामगिरी आणि निस्वार्थीपणाने कामे तडीस नेणारे प्रसादभाई सावंत हे खरोखरच एकमेव उत्तम नेतृत्व माझ्या दृष्टीक्षेपात आले असल्याने सावंत यांनी अल्पावधीतच आपला ठसा राजकीय क्षेत्रात उमटवला आहे. तरुण वयात त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत असताना त्याला राजकारणाची जोड देऊन अनेक महत्वाकांक्षी कामे पूर्णत्वास नेली आहेत. आणि नगरपरिषदेत एकहाती सत्ता स्थापन करून देखील या व्यक्तीचे पाय आजही जमिनीवर आहेत. नेहमीच गराजवंतांना सढळ हाताने मदत करून युवा पिढीला क्रीडा क्षेत्रात पाय रोवण्यासाठी स्वखर्चाने डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा भरवून इथल्या नवोदित खेळाडूंच्या कलेला वाव देण्यासाठी प्रेक्षकांसमोर आणून पुढाकार घेत आहेत. त्यामुळेच युवा वर्ग त्यांच्याकडे मोठया प्रमाणावर आकर्षित होत आहे. कष्टकरी लोकांना सुध्दा नेहमीच मदत आणि माथेरान मधील अनेक क्रिकेटची मंडळे क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करतात त्यावेळी त्यांना प्रसादभाई हेच आवर्जून सढळ हस्ते मदत करतात त्यामुळेच अनेक क्रिकेट स्पर्धा येथील मंडळे भरवीत असतात.
हे सर्व गुण प्रसादभाई यांच्याकडे असल्याने मला त्यांचे एखादे चित्र निर्माण करून त्यांना भेट स्वरूपात द्यावे ही माझी इच्छा होती.
माथेरानच्या राजकीय पटलावरील मुख्य केंद्रबिंदू समजले जाणा-या प्रसादभाई सावंतांचे चित्र माझ्या कुंचल्यातून रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. असे जितू गायकवाड यांनी सांगितले. हे चित्र प्रसादभाईंना देताना जितू गायकवाड यांच्या सोबत क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष प्रवीण सकपाळ, वनसंरक्षक समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र कदम, वनसंरक्षक समितीचे माजी अध्यक्ष गिरीश पवार,सामाजिक कार्यकर्ते शैलेश चाफेकर, विजय कदम आदी उपस्थित होते.








Be First to Comment