Press "Enter" to skip to content

बांधपाडा ग्रामपंचायतीच्या राष्ट्रीय पेयल योजनेत भ्रष्टाचाराचा संशय

ठेकेदाराची चौकशी करण्याची मनसेची मागणी

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।

तालुक्यातील बांधपाडा खोपटे ग्रामपंचायतीत राष्ट्रीय पेयल योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईनचे १ कोटी ६८ लाखाच्या कामात ठेकेदाराने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याचा संशय असून त्याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उरण उपतालुकाध्यक्ष सत्यवान भगत यांनी गटविकास अधिकारी नीलम गाडे यांच्याकडे केली आहे.

आदर्श गाव विकास योजने अंतर्गत खासदार श्रीरंग बारणे यांनी बांधपाडा खोपटे हे गाव दत्तक घेतले होते. गावाला भेडसावणारी पाण्याची समस्यां सोडवण्यासाठी राष्ट्रीय पेयल योजनेअंतर्गत पाईप लाईन गेल्या ४ वर्षांपूर्वी जिल्हा परिषद सदस्यांनी मंजूर केली होती. सदर कामाचा १ कोटींचा
ठेका ओम साई कोन्ट्रॅकशनचे कोळी यांना २०१७ साली देण्यात आला होता. काम पूर्ण न झाल्याने २०१८ साली बिलाची रक्कम वाढवून देण्यात आली. तरीही काम पूर्ण न झाल्याने उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र २५/८/२०२० रोजी ठेकेदाराने १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर लिहून देत पाईपलाईनचे काम १५ ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करतो असे सांगितले होते. मात्र आजतागायत हे काम पूर्ण झालेले नाही. काम पूर्ण न होता कामाचे पूर्ण बिल ठेकेदाराला ही देण्यात आले असल्याची चर्चा आहे. त्यासाठी लागणारी कागदपत्रे शासकीय अधिकारी वर्गांनी दिली असल्याचे समजते.

तरी संबंधित ठेकेदाराने पाईपलाईनचे काम पूर्ण न करता ग्रामस्थांबरोबर शासनाचीही फसवणूक केली आहे. तरी या भ्रष्ट कारभाराची सखोल चौकशी करून ठेकेदारासह त्यांना या भ्रष्टाचारात साथ देणाऱ्या शासकीय अधिकारी वर्गावर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी मनसेचे उपतालुकाध्यक्ष सत्यवान भगत यांनी उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नीलम गाडे यांच्याकडे केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.