सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान ।
माझी वसुंधरा अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या उपस्थितीत वीर हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या पुण्यतिथी दिनावेळी हुतात्मा स्मारक येथील पटांगणात हरित शपथ कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी नगरपरिषदेचे गटनेते तथा बांधकाम सभापती प्रसाद सावंत, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, उप नगराध्यक्ष आकाश चौधरी, कार्यालय अधीक्षक रणजित कांबळे यांसह अन्य नगरसेवक,नगरसेविका,कर्मचारी,नागरीक उपस्थित होते.
हुतात्मा स्मारक पटांगणात घेण्यात आलेली शपथ…
मी शपथ घेतो की, मी स्वतः दहा मोठ्या होणाऱ्या झाडांची लागवड व जोपासना करून तसेच माझे पालक, भाऊ, बहीण आणि माझ्या शेजारी दहा झाडांची लागवड व जोपासना करतील याची दक्षता घेईन.
मी माझे घर परिसरात स्वच्छ ठेवेन व पर्यावरणाची हानी करणाऱ्या उत्पादनांचा वापर शक्यतो टाळेन. मी माझ्या घरात, परिसरात, कामाच्या ठिकाणी पाण्याचे पुनर्वापर आणि पुनर्भरण तसेच अन्य वस्तूंचा पुनर्वापर करून मी पर्यावरण संस्कृतीला प्रोत्साहन देईन. सौर, बायोगॅस नूतनीकरणक्षम ऊर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहन देईन. माझे घर परिसर आणि मित्र-मैत्रिणींमध्ये पर्यावरण संवर्धन विषयक जागृतता निर्माण करेन. पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्याच्या माध्यमातून मी पाण्याचे संवर्धन करेन आणि हाच संदेश कुटुंब व मित्र मैत्रिणी पर्यंत पोहचवेन.
मी समाजात एक सुज्ञ नागरिक म्हणून माझ्या कुटुंबाच्या भौतिक सामाजिक आर्थिक गरजा पूर्ण करताना पर्यावरण आणि जैवविविधतेचे संवर्धन होईल असे निर्णय घेईन.
नगरपरिषद कार्यालय अधीक्षक रणजीत कांबळे यांनी पर्यावरण संवर्धन शपथचे वाचन केले त्यामागे उपस्थित सर्वांनी वाचन करून पर्यावरण संवर्धनशपथ घेतली.
चला पर्यावरण जपुया…..
माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छता अभियान 2021 च्या अनुषंगाने दिनांक 23 डिसेंम्बर 2020 रोजी माथेरान-नेरळ घाटरस्ता स्वच्छता मोहीम राबविण्यात आली त्यात प्रचंड प्रमाणात प्लास्टिक, प्लास्टिक तसेच काचेच्या बाटल्या, पत्रावळ्या घाट रस्त्याच्या दुतर्फा तसेच जंगलात फेकलेल्या आढळून आल्या हा सर्व कचरा जमा करून योग्यती विल्हेवाट लावण्यासाठी माथेरानच्या तसेच नेरळच्या आणि आजूबाजूच्या परिसरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांची साथ लाभली, तरी ह्यात सहभागी असलेल्या सर्व संघटना अध्यक्ष, सदस्य, नेरळ ग्रामपंचायत ,वनविभाग,माथेरान गिरीस्थान नगरपरिषद सदस्य, अधिकारी ,कर्मचारी, महिला आघाडी, माथेरान हॉटेल असोसिएशन,पत्रकार या सर्वांच सहकार्य खूपच मोलाचं आहे.
माथेरान हे प्रदूषण विरहीत पर्यटन स्थळ असून येथील सर्वजण पर्यटनावर उपजीविका करतात,सध्या पर्यटन हंगाम सुरू आहे आणि असचं जास्तीत जास्त पर्यटक यावे ही सदिच्छा पण त्यांनी येथील पर्यावरण जपावे,निसर्गाच्या सानिध्यात मनमुराद आनंद घेत असताना त्याची जपणूक करावी,घाट रस्त्यावर तसेच इतर कोठेही उघड्यावर कचरा/प्लास्टिक फेकू नये ही दक्षता घ्यावी जेणेकरून हे पर्यटनक्षेत्र स्वच्छ, सुंदर राहील, ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोतच, त्याच बरोबर वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग,पोलीस प्रशासन, टॅक्सी चालक-मालक संघटना, अश्वपाल संघटना ह्यांनी सुद्धा जागरूक राहिलं पाहिजे तरच हे पर्यावरण प्रदूषण नियंत्रण ठेवणे शक्य होईल आणि आपल्या माथेरान आणि निसर्गाच्या प्रेमापोटी आपण हे नक्कीच आवडीने करू शकतो.
कचरा घाट रस्त्यात,पॉईन्ट फिरायला/पर्यटनाचा आनंद घेत असताना जंगलात/इतरत्र न फेकता कापडी पिशवीत ठेवावा आणि योग्य ठिकाणी कचरपेटीत टाकावा,कचरा जाळू नये हे सर्वांना आवाहन करत आहोत.ह्याच अभियान अंतर्गत दिनांक 01जानेवारी 2021 रोजी माथेरान नगरपरिषद कार्यालयात हरित शपथ घेतली तसेच आज दिनांक 02 जानेवारी 2021 रोजी हुतात्मा स्मारक येथे वृक्षारोपण केले आणि सर्वांनी हरितशपथ घेतली,धुरापासून होणार प्रदूषण रोखण्यासाठी कचरा/प्लास्टिक ,पाला पाचोळा जाळू नये हे महत्व सांगितलं.सर्वांच्या सहकार्याने हे अभियान नक्की यशस्वी होईल यात शंका नाही.
प्रेरणा प्रसाद सावंत,नगराध्यक्षा माथेरान








Be First to Comment