आजीबाईच्या बटव्यातल्या आयुर्वेदिक औषधाला राजाश्रय कधी ?
सिटी बेल लाइव्ह / उरण ( अजित पाटील यांजकडून )
वाढले कोरोना रुग्ण करा लॉकडाऊन , धरा रस्त्यावर फिरणाऱ्या मंडळीला फाडा दंडाच्या पावत्या असा सगळा प्रकार सध्या कोरोना या साथरोगाच्या निमित्ताने सुरू असल्याचे दिसून येत आहे . मात्र या सततच्या लॉकडाऊनने साथ आटोक्यात आली आहे असे कोणतेही लक्षणंही दिसत नाही उलट रुग्णाचा एकूण आकडा दिवसागणिक वाढतच चाललेला असताना ज्या आयुर्वेदाने आणि संजीवनी सारख्या वनस्पतीने रामायणात मूर्च्छित पडलेल्या लक्ष्मणाला जिवंत केले त्या आयुर्वेदाला राजाश्रय कधी? असा सवाल आता विचारला जात आहे. ज्या भारताने संपुर्ण जगाला जे आयुर्वेद रामबाण औषध म्हणून दिलं ! ज्या जडी बुटीने पुराणकाळापासून अनेकांना जीवदान दिलं , राजा महाराज्यांच्या दरबारात ज्या झाड पाल्याच्या औषधीला राजाश्रय होता त्याला अजूनही या महामारीच्या निमित्ताने रामबाण अस्त्र म्हणून का बाहेर काढले जात नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. विशेष म्हणजे आयुर्वेदातच उपयुक्त ठरलेला काढा मालेगाव मध्ये फेमस झाला त्यातूनच तो उभ्या महाराष्ट्रात एक पॅटर्न म्हणूनही पोहोचला असताना अजूनही झाड पाल्या पासून तयार होणाऱ्या औषधांना रुग्नांवर उपचार करण्याची रीतसर परवानगी कशी दिली जात नाही असा सवाल येथे विचारला जात आहे .
पुर्वीच्या काळी ताप आला किंवा सर्दी खोकला झाला तर त्या काळी गावोगावी डॉक्टर वैगरे नव्हते आणि शहरात जायला वाहतुकीची साधने आणि दळणवळणंही फारसे नव्हते अशावेळी घरातील वयस्कर मंडळी विशेषतः आपली आज्जी आपल्याला काही काढे करून द्यायची त्या सरशी अगदी फणफणलेला ताप, सर्दी , खोकला अगदी भुर्रकन निघून जायचा ! त्या काळात ना कुठे व्हेन्टिलेटरची व्यवस्था होती ना ही ऑक्सिजन मास्कची मुबलकता होती. मात्र आजीने केलेले घरगुती उपाय सरस ठरत होते. अगदीच काही नाही तर ओव्याची धुरी , मिठाच्या गरम पाण्यातून घ्यायच्या गुळण्या , कफ झाला असल्यास लसूणच्या पाकळ्यांची गळ्यात घातली जाणारी माळा, नेहमीच्या खाण्यात मुखशुद्धी म्हणून होणारा ओव्याचा वापर असे अनेक घरगुती उपाय केले जात असत. त्यातूनच मुळात आजारी पडण्याची संख्याच अतिशय कमी होती. त्यातूनही कुणी आजारी पडलेच तर बहुतांशी रुग्ण घरगुती औषधांनीच बरे होत होते. सध्या जगभर कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. या आजारावर औषध शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ कसोशीने प्रयत्न करीत आहेत मात्र अजूनही कोणालाही शंभर टक्के यश आलेले आज तरी दिसत नाही. या सर्व पार्शवभूमीवर जुन्या काळात हमखास केले जाणारे काढे वनऔषधींना अजूनही योग्य तो राजाश्रय का दिला जात नाही असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे . पुर्वी काविळीवर अतिशय उपयुक्त ठरणाऱ्या काढ्यासाठी उपयोगी असणारी गुळवेल , कडू चिरायता , गुड्डूची , अश्वगंधा , सागर गोटा , वेखंड , कुडा , जायफळ , डिकेमाळी , हिरडा (आई ) आवळा , तुळस आदी प्रकारच्या वनस्पती चा वापर करून पूर्वीच्या काळी आजीबाई आपल्या घरच्यांना आजारापासून दूर ठेवत होत्या. सागरगोटा, मुरुडशेंग, मायफळ, कुडामुळ,वेखंड, डिकेमाली,हिरडा, बाळ हिरडा, अतिविष,हळकुंड, बेहडा, पिंपळी,सुंठ, नागरमोथा, जायफळ, काकडशिंगी, जेष्ठमध,अश्वगंधा,खारिक, बदाम, वावडिंग अशा अनेक वनस्पती आयुर्वेदात वापरून अनेक आजारांना सहज घालविले जात होते. या वनस्पती पोटदुखी, ताप, कफ, अशक्तपणा, हगवण, कृमी,त्वचाविकार यावर उपयुक्त होत्या . ग्रामीण भागात गुळवेळ व कडूकिराईत चा ही वापर मोठ्या प्रमाणात केला जायचा . .कडूकिराईत तापावर उत्तम औषध आहे. कोणत्याही प्रकारचा ताप या वनस्पतीने बरा होतो. गुळवेळीस संस्कृत मध्ये अमृता म्हणतात.गुळवेल खरोखरच अमृता सारखी गुणकारी आहे. ही वनस्पती म्हणजे युनिव्हर्सल टॉनिक आहे. ताप, यकृत रोग,कावीळ, त्वचारोग, संधीवात, धातुक्षय, अर्श, उदर विकार ,नेत्रविकार,प्रदर, खोकला आदीवर ही वनस्पती खूपच उपयुक्त असल्याचे दाखले आयुर्वेदात आहेत. त्याचबरोबर पूर्वीच्या काळातल्या अनेक साथ रोगांवरही अशा आयुर्वेदिक औषधांनी कमाल केल्याची अनेक उदाहरणे ही आहेत. सध्याच्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर गावोगावच्या महाराष्ट्र भरातील अनेक वैद्य,पारंपारिक वनौषधी देणारे, वंशावळींने औषधी देण्याचा दांडगा अनुभव असणारे अनेकांनी या आजारावर आपल्या औषधाने शंभर टक्के फरक पडेल असे दावे केलेले असताना प्रशासनाने मात्र यापैकी बहुतेंकांचे आजतागायत साधे ऐकूनही का घेतलेले नाही असा सवाल विचारला जात आहे. आयुर्वेदिक गोळ्या बनविणाऱ्या पारंपारिक वनौषधी देणाऱ्याने तर प्रशासनाला नक्की ही महामारी घालवायची आहे की नाही असा सवाल करताना आम्ही दिलेली औषधे काय आहेत त्यात काय मिक्स केले आहे , त्यात ज्या झाडांच्या सालीचा वापर केला आहे ती साल आपण कोणाच्या परवानगीने काढली अशा प्रकारच्या प्रश्नांमध्येच जास्त स्वारस्य असल्याचा आरोप केला आहे. बरे हे सर्व सांगितले तर त्याचे पेटंट देण्याबाबतही प्रशासनाकडून काहीच ठोस असे सांगितले जात नसल्याने असे अनेक पारंपारिक वनौषधी देणारे देखील समोर यायला कचरत असल्याचे दिसून येत आहे.






Be First to Comment