Press "Enter" to skip to content

चिवे आदीवासी आश्रमशाळेत शैक्षणिक साहित्य व खाऊ चे वाटप

बौद्ध समाज युवा संघ रायगड यांच्या वतीने सावित्रीमाईं फुलेंच्या जयंतीनिमित्त उपक्रम

सावित्रीमाईंचे जीवनकार्य समस्त महिलांना आदर्श व प्रेरणा देणारे :- सारिका रुपवते

सिटी बेल लाइव्ह । पाली/रायगड । धम्मशील सावंत ।

बौद्ध समाज युवा संघ रायगड आयोजित राष्ट्रमाता क्रांतीज्योती माता सावित्रीमाई फुले यांचा 190 वा जयंती महोत्सव विविध वैचारिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. जयंतीचे औचित्य साधून आदिवासी आश्रमशाळा चिवे येथील 150 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्रीमाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी प्रमुख वक्त्या सौ.सारिका संजय रुपवते यांनी बोलताना सावित्रीमाई यांच्या संघर्षातून आज महिलांना सुखाचे दिवस आले, त्या चंदनापरी झिजल्या म्हणून आमच्या जीवनाचे सोने झाले.

सावित्रीमाईंचे जीवनकार्य समस्त महिलांना आदर्श व प्रेरणा देणारे आहे. शेण, दगड गोटे खाऊन त्या महिलांच्या हक्क अधिकारासाठी झटल्या. महिलांसाठी काढलेली पहिली शाळा हे त्यांच्या जीवनातील क्रांतिकारी पर्व मानले जाते. महिलांमध्ये क्रांतीची ज्योत चेतवून क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या मार्गदर्शनाने पुरुषप्रधान संस्कृतीला आवाहन देत महिलांना चूल आणि मूल यातून बाहेर काढून शिक्षणाची कवाडे खुली करून दिली.

सावित्रीमाईंचा विचार कृतीतून पुढे नेणें हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल असे सारिका रुपवते म्हणाल्या.
वंदना शिंदे यांनी प्रगल्भपणे विचार मांडले. त्या म्हणाल्या की समाजातील जातीयता विषमता समूळ नष्ट करण्यासाठी फुले दाम्पत्य अविरतपणे संघर्ष करीत राहिले. समाजातील शोषित, वंचितांच्या, दिंनदुबळ्यांच्या न्यायहक्कांसाठी त्यांनी लढा दिला, जोतिबा फुलेंच्या व्यवस्था परिवर्तनाच्या कार्यात सावित्रीमाईनी मोठ्या हिमतीने सर्वोतोपरी साथ दिली. फुले दाम्पत्याने जीवनात केलेला पराकोटीचा संघर्ष , मनुवादी व्यवस्थेविरोधात उभारलेली सत्यशोधक चळवळ, उपसलेले कष्ट, याची गोड फळे आपण चाखत आहोत याची जाणीव समाजातील प्रत्येक घटकाला असली पाहिजे असे वंदना शिंदे म्हणाल्या. तर येथील विद्यार्थिनींनी सावित्रीमाई फुले यांच्या गीतावर नृत्याविष्कार सादर केला.

यावेळी विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. यावेळी गुणवंतांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्ही. के. जाधव, रवींद्र लिमये यांनी सावित्रीमाई फुले जयंतीच्या शुभेच्छा देत बौद्ध समाज युवा संघ रायगडने राबविलेल्या विविध प्रबोधनात्मक व लोकाभिमुख उपक्रमांचे कौतुक केले. या कार्यक्रमात प्रख्यात कवी गायक प्रभाकर ओव्हाळ व अस्मिता कांबळे यांनी शेरशायरीने कार्यक्रमात रंगत आणली.

यावेळी प्रमुख अतिथी कोकण नेते व्ही के जाधव, कुलाबा जिल्हा आदिवासी सेवा मंडळ संचालक रवींद्र लिमये, पाली पोलीस निरीक्षक विजय तायडे, सौ. उज्वला जगदाने, मनीषा पाटील, वावलोली आश्रमशाळा अधीक्षका श्रीमती स्वाती मुरकुटे, अधीक्षक मारुती गायकवाड, चिवे आश्रमशाळा अधिक्षका श्रीमती होमी पाडवी, वावलोली आश्रमशाळा मुख्याध्यापिका सरिता सावंत, चिवे आश्रमशाळा अधीक्षक किरण माळी, चिवे आश्रमशाळा माध्यमिक मुख्या: संदेश पिंगळे, चिवे आश्रमशाळा प्राथमिक मुख्याध्यापक जयवंत गुरव,बौद्ध समाज युवा संघ रायगड संस्थापक रमेश शिंदे, अध्यक्ष जितेंद्र गायकवाड, सचिव नरेश गायकवाड, कोषाध्यक्ष दीपक दाभाडे, रोहा अध्यक्ष रवींद्र गायकवाड, सविनय आहिरे, सुधागड तालुका अध्यक्ष सुधीर भालेराव, कायदेविषयक सल्लागार अमोल कांबळे, प्रभाकर ओव्हाळ, आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.