रायगड जिल्हा शेतकरी संघटनेच्या सुधागड तालुका अध्यक्षपदी पांडुरंग तेलंगे यांची नियुक्ती
सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत ।
रायगड जिल्हा शेतकरी संघटनेच्या सुधागड तालुका अध्यक्षपदी पांडुरंग लिंबाजी तेलंगे नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष हरीचंद्र शिंदे यांच्या हस्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
सदर नियुक्तीनंतर तेलंगे यांचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे. रायगड जिल्हा शेतकरी संघटना पाली सुधागड सह जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर, व शेती विषयाशी निगडित विविध प्रश्न व समस्या सोडविण्यात अग्रेसर राहिली आहे. शासनाच्या कृषी विषयक योजना व उपक्रम राबवून कृषी क्रांती घडविण्याच्या दृष्टीने संघटना व प्रत्येक पदाधिकारी तत्परतेने कार्यरत आहेत. संघटना व्याप्तीसाठी समाजात सामाजिक व सेवाभावी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तबगार व्यक्तींना संघटनेत सामावून घेतले जात आहे.
पांडुरंग तेलंगे मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना न्याय देण्याच्या दृष्टीने उभारलेल्या लढे व आंदोलनात सक्रिय सहभागी राहिले आहेत. पाली खोपोली मार्ग रुंदीकरण भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी ते सातत्याने झटत आहेत. लाभार्थी शेतकरी घटकाला शासनाच्या विविध योजनांचा जलद लाभ मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी आजवर प्रभावीपणे दिलेले योगदान वाखाणण्याजोगे राहिले. अन्यायग्रस्त, पीडित,शोषित वंचितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम ते करीत आहेत. शिवाय त्यांचा जनसंपर्क दांडगा असून अधिकाधिक लोकांना न्याय देणेकामी तेलंगे यांचे योगदान महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला, तर माझ्यावर ज्या विश्वासाने सुधागड तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली त्या पदाला साजेसे व शोभेसे काम करणार असल्याचे पांडुरंग तेलंगे यावेळी म्हणाले.
रायगड जिल्हा शेतकरी संघटनेशी निष्ठा ठेवून मुत्सुद्दी पणा दाखवून शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेचे हक्क, अधिकार व न्यायासाठी कार्यरत राहावे,यांबरोबरच संघटनेचे ध्येय धोरणे व उधिष्टपूर्ती साठी जोमाने काम करावे अशी अपेक्षा व्यक्त करून जिल्हाध्यक्ष हरीचंद्र शिंदे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी रायगड जिल्हा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हरीचंद्र शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष मारुती लांगी, पेण सुधागड रोहा मतदारसंघ अध्यक्ष रसिका पाठक, सुधागड तालुका सचिव कैलास दळवी, सहसचिव चंद्रकांत चव्हाण, ताराबाई सकपाळ, महादू मढवी आदींसह संघटनेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.








Be First to Comment