Press "Enter" to skip to content

कर्जत तालुक्यातील निराधारांना ना आधार : अपंग-विधवा-श्रावणबाळ धारक पेन्शनच्या प्रतीक्षेत !

सिटी बेल लाइव्ह / भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे

पालकमंत्री आदिती सुनील तटकरे यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत येणारी शासकीय कमिटी अद्यापी जाहीर केली नसल्याने जवळ जवळ सहा महिन्यांपासून अपंग , निराधार महिला ( विधवा ) , अपत्य नसलेली महिला , श्रावण बाळ या योजनेत समावेश असणाऱ्या निराधारांची बहुसंख्य प्रकरणे कर्जत तहसिल कार्यालयात धूळ खात पडली असतानाच कोरोना विषाणू महामारीच्या कधी लॉकडाऊन तर कधी अनलॉकमुळे शासकीय कामकाजावर परिणाम झाल्याने सरकारी काम आणि सहा महिने थांब , अशी परिस्थिती येऊन ठेपली आहे . त्यातच सरकारच्या तिजोरीत ” ठणठण गोपाळा ” असल्याने निराधारांना निधीच नसल्याचे समोर आले आहे . त्यामुळे पैशाअभावी निराधारांची उपासमारीची परिस्थिती ओढावली असून या गंभीर बाबीकडे कोणी लक्ष देत नसून राजकीय उदासीनता देखील प्रखरपणे दिसत आहे . त्यामुळे या निराधार घटकांची पैशाअभावी उपासमार तर वृद्धांना औषधे घेण्यास तसेच इतर गरजा भागविण्याची दयनीय अवस्था झाली आहे .
कर्जत तहसिल कार्यालयात चौकशी केली असता वरिष्ठ आदेशाने धूळ खात पडलेली प्रकरणे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर केली आहेत , मात्र अद्यापी त्यातील कुठल्याच निराधाराला पेन्शनची ” फुटी कवडी ” देखील मिळाली नाही . तर इतरांना देण्यासाठी सरकारकडे निधी उपलब्ध नसल्याचे सांगत आहेत . काही निराधारांसाठी तहसिल कार्यालयाकडून बँकेकडे दिलेले धनादेश एक – एक महिना पास होत नसल्याचे कारण पुढे आले आहे .त्यांना मे महिन्यापासून पेन्शन मिळाली नसल्याने या आपातकालीन कोरोना विषाणूच्या महामारीच्या परिस्थितीत या निराधारांनी जीवन कसे जगावे , असा यक्ष प्रश्न समोर आला आहे .
या विदारक परिस्थितीकडे राजकीय उदासीनता देखील दिसून येत असून पालकमंत्री , खासदार , आमदार देखील लक्ष देत नसल्याने कोण काय काम करतोय हेच समजेनासे झाले आहे .मात्र या उदासीनतेच्या गलथान कारभाराला निराधारांचा बळी जात असून उपासमारीची परिस्थिती त्यांच्यावर येऊन ठेपली आहे . तरी शासनाकडून मिळणारे पेन्शनचा लाभ निराधारांना त्वरित मिळावा , अशी मागणी छत्रपती शिवाजी राजे तक्रार निवारण संघटनेने केली आहे . कर्जत तालुक्या बरोबरच संपूर्ण रायगड जिल्ह्यात अशी परिस्थिती असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे मत संघटनेने व्यक्त केले आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.