खाजगी वाहनांच्या पार्किंग साठी माथेरान नगरपरिषद कटिबद्ध !
सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान ।
नववर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नाताळ पासुन नेहमीच पर्यटक प्रामुख्याने माथेरानला अधिकाधिक पसंती देत असतात. याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या पर्यटकांच्या मोटार गाड्या येथील दस्तुरी नाक्यावरील वनखात्याच्या अखत्यारीत असलेल्या जागेत पर्यटकांच्या खाजगी गाड्या मोठया प्रमाणात येत असल्याने काही वेळा पार्किंगची सोय जागेअभावी उपलब्ध होत नाही.यासाठी मागील दोन वर्षांपासून नगरपरिषदेच्या माध्यमातून गटनेते प्रसाद सावंत यांनी येणाऱ्या पर्यटकांचा पार्किंग अभावी हिरमोड होऊ नये यासाठी माथेरानच्या अगदी जवळ असलेल्या नेरळ माथेरान घाट रस्त्यावरील जुंमा पट्टी याठिकाणी पार्किंगची सोय उपलब्ध केली आहे.
त्यामुळे पर्यटकांना याठिकाणी आपल्या गाडया पार्क केल्यानंतर टॅक्सीने माथेरान गाठता येणार आहे. जुंमा पट्टी येथे खाजगी वाहनांची देखभाल या ठिकाणी कार्यरत असणारी मंडळी करणार आहे त्यामुळे अगदी बिनधास्तपणे पर्यटकांना माथेरानचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे.याअगोदर अनेकदा पार्किंग अभावी पर्यटक माघारी जात होते याचा विपरीत परिणाम इथल्या एकंदरीत पर्यटनावर होत असल्याने स्थानिकांची मोठया प्रमाणावर आर्थिक परिस्थिती खालावली होती.पर्यटन हीच इथली शेती असल्याने जर अशीच परिस्थिती प्रत्येक सुट्टयांच्या हंगामात राहिली तर स्थानिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
वर्षातून केवळ साठ दिवसांचा व्यवसाय स्थानिकांना लाभत असतो ही बाब लक्षात घेऊन गटनेते प्रसाद सावंत यांनी २०१८ पासूनच मुख्य सुट्टयांच्या हंगामात जुंम्मा पट्टी येथील मोकळ्या जागेत पार्किंग व्यवस्था सुरू केली आहे त्यामुळे पर्यटक मोठया संख्येने इथे हजेरी लावत आहेत.सलग तीन दिवस या जागेची पूर्ण व्यवस्था आणि नियोजन करण्यासाठी प्रसाद सावंत यांनी संबंधित कामगार तसेच ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात घेऊन पर्यटकांना सहकार्याची भूमिका घेण्याबाबत सांगितले आहे. यावेळी कार्यतत्पर मुख्याधिकारी प्रशांत जाधव तसेच जुंम्मा पट्टी येथील मान्यवर मंडळी उपस्थित होते.
दस्तुरी येथील प्लॉट क्रमांक ९३ हा पडून आहे. ह्या प्लॉटवर मोठया प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले असून कुणी ह्या प्लॉटचा ताबा घेण्याअगोदर आणि तिथे होत असलेले अतिक्रमण दूर करून नगरपरिषदेने पोलीस प्रशासनाच्या मदतीने तिथे सुसज्ज पार्किंगची सोय उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तरच जवळपास दोनशे पेक्षाही अधिक गाड्यांची व्यवस्था होऊ शकते.अन्यथा हा प्लॉट नकळत जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या आशीर्वादाने हातचा निसटून जाईल याचा थांगपत्ता सुध्दा नगरपरिषदेच्या लोकप्रतिनिधीना लागणार नाही.असे सुज्ञ नागरिकांमधून बोलले जात आहे.








Be First to Comment