नागोठण्यातील व्यापाऱ्यांना करात सूट द्यावी : आ. अनिकेतभाई तटकरे यांची प्रांताधिका-यांना सुचना
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।
नागोठणे बाजारपेठ ही शिवकालीन बाजारपेठ असून बाजारपेठेत दुकान व घर एकच असताना नागोठणे तलाठी यांनी दुकानदारांना वाणिज्यिक १० हजार रुपयांचा कर लावल्या संदर्भात सर्व व्यापाऱ्यांना नोटीस पाठवल्यामुळे व्यापारी वर्ग हतबल झाला असून व्यापारी असोसिएशनने याबाबत आ. अनिकेतभाई तटकरे यांना साकडे घातल्या नंतर आमदार तटकरे यांनी नागोठण्यातील व्यापारी व रोहा प्रांताधिकारी डॉ. यशवंतराव माने यांची बुधवारी सायंकाळी संयुक्त बैठक घेऊन नागोठण्यातील व्यापाऱ्यांना करात सूट द्या अशा सूचना केल्या. दरम्यान या विषयावर आता लवकरच काही तरी तोडगा निघेल असा विश्वास व्यक्त करून व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.
रोहा येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीच्या वेळी नागोठणे बाजारपेठेतील व्यापारी आपली जागा अनधिकृत बिनशेती / वाणिज्य कारणासाठी वापर करत असल्याच्या अनुषंगाने त्यांना नोटीस पाठविण्यात आल्या असल्याचे रोहा प्रांताधिकारी डॉ. यशवंतराव माने यांनी स्पष्ट केले.
कोरोना महामारीच्या अनुषंगाने शासनाने लागू केलेले लॉकडाऊन व निसर्ग चक्रीवादळामुळे व्यापारी वर्ग पूर्णतः खचून गेला असल्यामुळे त्यांना लावण्यात आलेल्या करातुन सूट द्यावी अशा सूचना यावेळी आमदार तटकरे यांनी रोहा प्रांताधिकारी डॉ. यशवंतराव माने यांना दिल्या.
यावेळी नागोठणे व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष अनिलशेठ काळे, दिलीप शहासने, महेश मेहता, गुड्डू मोदी , किरण काळे, उमाजी चव्हाण, महेंद्र म्हात्रे, नसिम अधिकारी अरविंद जावरे, अरुण गुरव, विनोद मोदी, बंटी मोदी, अजित काळे, किशोर भानुशाली आदींसह व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व सद्स्य उपस्थित होते.








Be First to Comment