भारत पेट्रोलियमच्या नागोठण्यातील “त्या” पेट्रोल पंपाची रोहा तहसिलकडून तपासणी
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।
भारत पेट्रोलियमच्या नागोठण्यातील पेट्रोल पंपातील पेट्रोल आपल्या गाडीत भरल्यानंतर त्रस्त झालेल्या मोटारसायकल स्वारांनी हे पेट्रोल पाणी मिश्रित असल्याच्या अनेक तक्रारी रोहा तहसीलदारांकडे केल्या होत्या. ही बातमी सिटी बेल लाइव्ह ने प्रसारीत केल्यानंतर वाहनचालकांच्या याच तक्रारींची दखल रोहाच्या तहसीलदार कविता जाधव यांच्याकडून तत्काळ घेण्यात आली आहे.
त्यानुसारच तहसीलदार कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा तहसील कार्यालयातील पाच जणांच्या पथकाने भारत पेट्रोलियमच्या नागोठण्यातील या पेट्रोल पंपावर मंगळवार दि. २२ डिसेंबर रोजी सायंकाळी भेट देवून पेट्रोल पंपाची तपासणी केली व पेट्रोलचे नमुनेही त्यांच्याकडून तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यामुळे नागोठणे विभागातील वाहनचालक ग्राहकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
रोहा तहसीलदार कार्यालयातून आलेल्या या तपासणी पथकात प्रभारी पुरवठा निरिक्षक अधिकारी मानसी साठे, पुरवठा विभागाच्या अव्वल कारकून सुनीता जाधव, नागोठणे मंडळ अधिकारी सुनील जाधव, पुरवठा विभागाचे अव्वल लेखा कारकून अभिजित महाडिक व वरवठणे तलाठी नंदकुमार पाटील यांचा समावेश होता.
दरम्यान भारत पेट्रोलियमच्या नागोठण्यातील या पेट्रोल पंपातील पेट्रोलचे नमुने मुंबई येथे प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठविण्यात येणार असून त्याचा अहवाल मिळताच याप्रकरणी पुढील कार्यवाही करण्यात येईल असे रोहाच्या तहसीलदार कविता जाधव यांनी सांगितले.








Be First to Comment