Press "Enter" to skip to content

निकृष्ट कामाविरोधात संदीप पाटील आक्रमक

सिडको रहिवाशांना पूर परिस्थितीत ढकलत आहे
संदीप पाटील यांचा खणखणीत आरोप

सिटी बेल लाईव्ह/ नवीन पनवेल.

    सिडकोने नवीन पनवेल नोड विकसित केलेल्याला आज 25 वर्षांहून अधिक वर्षे लोटली आहेत. अर्थातच त्यामुळे सिडकोच्या वतीने टाकण्यात आलेल्या अंतर्गत वाहिन्या, सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या या आताशा जीर्ण झाल्या आहेत. जीर्ण झालेल्या अशा सगळ्या वाहिन्या भूमिगत गटारे आणि नाले स्वच्छ करण्यात येऊन त्यांची पुनर्बांधणी करावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने करण्यात येत होती. संदीप पाटील यांच्या मागणीची दखल घेऊन सिडकोने वाहिन्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. परंतु ही कामे होत असताना त्यात अक्षरशः थुकपट्टी लावण्याची कामे होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संदीप पाटील यांनी आक्रमक होत सिडको अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
       माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी सिडकोने विकसित केलेल्या नवीन पनवेल मधील विकासकामांचे बाबत नेहमीच जागरूकता दाखवली आहे. नुकतीच त्यांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या समवेत जाऊन सिडको अभियंत्यासोबत विकासकामांचे बाबत आढावा बैठक घेतली होती. संदीप पाटील यांच्या मागणीनुसार नवीन पनवेल नोड मधील अंतर्गत गटारे, भूमिगत गटारे, नाले यांची स्वच्छता व पुनर्बांधणी काम हाती घेण्यात आले आहे. नवीन पनवेल मधील महत्त्वाचा समजला जाणारा रस्ता अर्थातच अभ्युदय बँक ते ए टाईप हा रस्ता आहे. या रस्त्याच्या एका बाजूच्या गटारांची बांधणी करताना सिडकोने व्यवस्थित रित्या गटारे खणून त्याची पुनर्बांधणी केली. परंतु दुसरीकडील बाजूस मात्र केवळ दोन फुटी सिमेंट पाईप टाकून चालढकल करण्याची कामे करण्यात येत होती. याबाबत कुणकुण लागताच संदीप पाटील यांनी कामाचे ठिकाणी जाऊन सिडको अधिकाऱ्यांना पाचारण केले. निकृष्ट कामाचे बाबत अधिकाऱ्यांना अवगत गेले व नागरी सुविधा देण्याच्या बाबत सिडको गंभीर नसल्याचा आरोप केला. याबाबत अधिक माहिती देताना संदीप पाटील म्हणाले की, आज पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या व गटारे जीर्ण झाली आहेत.दोन तास सलग पाऊस पडल्यानंतर येथे पाणी तुंबते, तळमजल्यावरील नागरिकांचे धाबे दणाणतात.यंदाच्या पावसाळ्यात पाच ते सहा वेळा अशी परिस्थिती निर्माण झाली की  लोकांनी त्यांचे सामानसुमान बांधून वरच्या मजल्यावर हलविण्यास सुरुवात केली.या समस्या टाळण्याच्या साठी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या, भूमिअंतर्गत गटारे ही स्वच्छ करून आकाराने मोठी झाली पाहिजेत. त्याकरिता मी जातीने या कामावर लक्ष ठेवून आहे. परंतु अशा प्रकारे जर थुक् पट्टी लावण्याची कामे होणार असतील तर ते आम्ही कदापिही खपवून घेणार नाही.
पनवेल महानगरपालिका निर्माण झाल्यानंतर येथील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याची सारी कामे सिडकोने प. म.पा.कडे हस्तांतरित करणे अपेक्षित आहे. सिडकोकडून समाधानकारक कामे होत नाहीत आणि सेवासुविधा महानगरपालिकेकडे हस्तांतरित होत नाहीत अशा विचित्र परिस्थितीत सिडको नोडमध्ये राहणारे नागरिक अडकले आहेत.अशा प्रकारे निकृष्ट  प्रकारे कामे करून सिडको सेवा,सुविधा हस्तांतरित करणार का? हा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतो.
संदीप पाटील यांनी चाल ढकलू पणा करत काम करणाऱ्यांना ताकीद दिली त्यावेळी सिडकोचे अधिकारी आणि विविध असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.तसेच सामाजिक कार्यकर्ते जगदीश घरत, तुषार भगत, भूषण म्हात्रे, नितीन चोरघे आदी मान्यवरांनी देखील सिडको अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात पुढाकार घेतला.

विविध असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे संदीप पाटील यांच्याकडे मागणी केली आहे की सिडको द्वारे केल्या जाणाऱ्या अशा निकृष्ट कामांचे बाबत आपण लक्ष द्यावे. त्यानुसार येत्या दोन दिवसात संदीप पाटील सिडको अधिकारी यांच्यासोबत बैठक घेणार असून याबाबत जाब विचारणार आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.