नागोठण्यात पाणी मिश्रित पेट्रोल : ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या : वाहन चालकांतून तीव्र संताप
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।
नागोठण्यातील हायवेनाका येथील भारत पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल पंपावर पाणी मिश्रित पेट्रोल मिळत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पाणी मिश्रित पेट्रोल मुळे ग्राहकांमध्ये कमालीची नाराजी पसरली असून कितीही तक्रारी केल्या तरी संबंधित शासकीय अधिकारी तक्रारींकडे लक्षच देत नाहीत. अशी नाराजी ग्राहकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान आपल्या मोटारसायकलच्या पेट्रोल टाकीतून पाणी काढण्यासाठी गॅरेज मध्ये ग्राहकांची गर्दी झालेली दिसून येत आहे. तसेच भारत पेट्रोलियम पेट्रोल पंप चालकांनी आम्हास चांगल्या प्रकारचे पेट्रोल द्यावे अशी मागणी नागोठण्यातील ग्राहक वर्गाकडून केली जात आहे.
यासंदर्भात रोहा तहसीलदार श्रीमती कविता जाधव यांनी सांगितले की, नागोठणे येथील भारत पेट्रोलियम पंप मध्ये पाणीमिश्रित पेट्रोल दिले जाते याची आजच तक्रार माझ्याकडे आली आहे. तक्रारी नुसार आम्ही याबाबत तपासणी करू व त्याचा अहवाल पुढे पाठवणार आहोत.
काल पासून पाच ते सहा गाड्यांच्या पेट्रोल टाकीमधून पाणी काढले. यामुळे गाडी चालक वैतागलेले आहेत. मी एका गाडीतून दिड ते दोन लिटर पाणी काढले. भारत पेट्रोलियम पेट्रोल पंप वाले बाटलीतून पेट्रोल देत नाहीत. त्यामुळे पेट्रोल मध्ये पाणी आहे हे कसे कळणार. मग ग्राहकांना आमच्या कडे यावे लागते असे मोटार सायकल मेकॅनिक प्रदिप मोहिते यांनी सांगितले.

मी काल माझ्या मोटारसायकल मध्ये भारत पेट्रोलियम पेट्रोल पंपातुन पाचशे रुपयांचे पेट्रोल टाकले. पेट्रोल टाकल्या नंतर थोड्या अंतरावर मोटारसायकल पिकअप घेत नव्हती व मधे मध्येच बंद पडत होती त्यामुळे कसेतरी मी गॅरेज मध्ये गेलो. तेथे मॅकॅनिकलने मोटारसायकलच्या पेट्रोल टाकीतुन पाणी काढून टाकी साफ केली. यामुळे मला नाहक १०० रुपयाचा फटका बसला असे एक मोटारसायकल चालक शैलेश मांडवकर यांनी सांगितले
दरम्यान यासंदर्भात भारत पेट्रोलियमच्या या पेट्रोल पंपचे व्यवस्थापक मुस्ताकभाई चोगले यांनी सांगितले की, आमच्या पेट्रोल पंप मध्ये पाणी मिश्रित पेट्रोल विकलेच जात नाही. आम्ही तक्रारदार ग्राहकांना केंव्हाही सॅम्पल काढून चेक करून दाखवू शकतो. सर्व्हिसिंग करताना गाडीच्या टाकीत पाणी जाऊ शकते. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या आदेशाने पेट्रोल मध्ये १० टक्के इथेनॉल मिसळले जाते. पेट्रोल टाकीत पाणी असल्यास इथेलॉन पाणी होते असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.








Be First to Comment