सिटी बेल लाइव्ह । धाटाव । शशिकांत मोरे ।
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीजकडून धाटाव आदिवासी वाडीतील कुटुंबाना शेळ्यांचे वाटप करण्यात आले. नुकत्याच घेण्यात आलेल्या ‘उपजीविका विकास’ या उपक्रमाअंतर्गत धाटाव आदिवासी वाडी येथील ११ कुटुंबांना ८० शेळ्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये दोन मोठ्या शेळ्या, चार लहान पिल्ले व एक बोकड अशा स्वरूपात हे वाटप झाले.
यावेळी धाटावचे उपसरपंच यशवंत रटाटे, ‘सुदर्शन’च्या ‘सीएसआर’ विभागाच्या वरिष्ठ व्यवस्थापक माधुरी सणस, रुपेश मारबते, कर्वे संस्थेचे राजू घारगे, ग्रामपंचायत सदस्य उत्तरा उत्तम म्हसकर, मंदा वाघमारे, धाटाव आदिवासी वाडी ग्राम अध्यक्ष मारुती वाघमारे व आदिवासी वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
सुरवातीला या वाडीतील गरजू कुटुंबाची निवड करून त्यांना शेळीपालन व्यवस्थापन, विविध शेळ्यांच्या जाती, आहार, आजार आणि उपचारपद्धती याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच शेळ्यांच्या निवाऱ्यासाठी ‘सुदर्शन’कडून कुटुंबाना शेड बांधून देण्यात आले. येथील वातावरणास पुरक जातीच्या शेळ्यांची निवड करण्यात आली. या शेळ्यांना काही झाल्यास, कुटुंबांचे नुकसान होऊ नये, यासाठी वाटप केलेल्या शेळ्यांचा विमाही उतरविण्यात आला आहे
“सामाजिक बांधिलकी (सीएसआर) उपक्रमांतर्गत सुदर्शन सीएसआर फौंडेशनमार्फत सामाजिक जाणिवेतून आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण व उपजीविका विकास या चार विभागात सातत्यपूर्ण उपक्रम राबविलेले जातात. हा प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यासाठी पुण्यातील कर्वे सामाजिक सेवा संस्थेचे सहकार्य घेण्यात आले. धाटाव येथील आदिवासी वाडीतील कुटुंबांच्या विकासासाठी ‘सुदर्शन’ यापुढेही प्रयत्नशील राहील,” असे मत माधुरी सणस यांनी व्यक्त केले.
सुदर्शनच्या सामाजिक उपक्रमांचा फायदा समाजामध्ये दिसून येत आहे.शेळीवाटप हा अत्यंत स्तुत्य उपक्रम सुदर्शनने हाती घेतलेला आहे. “असे मत धाटावचे उपसरपंच यशवंत रटाटे यांनी व्यक्त केले आणि त्यांनी राबवित असलेल्या उपक्रमांबद्दल सुदर्शन सी एस आर फौंडेशनचे आभार मानले.








Be First to Comment