कर्जबाजारी झाल्याने विजयकुमार नायर यांनी केली आत्महत्या
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।
नागोठण्यातील न्यू सूर्यदर्शन हाऊसिंग सोसायटी मधील रहिवासी विजयकुमार माधवन नायर (वय ४५) यांनी आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नागोठण्याजवळील निडी येथील आपल्या कार्यालयातील पंख्याला नायलाॅनची दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.
नेहमी हसतमुख चेहरा असलेल्या व नागोठण्यात खुप मोठा मित्रपरिवार असलेल्या विजयकुमार नायर यांच्या आत्महत्येने नागोठण्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कर्जबाजारी झाल्याने विजयकुमार नायर यांनी आत्महत्या केल्याचे नागोठणे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

ट्रेलरवरील माल वाहतूकीचा व्यवसाय असलेल्या विजयकुमार नायर यांचे नागोठण्याजवळील निडी येथे श्री साई लाॅजिस्टिक कंपनी नावाचे ट्रान्सपोर्टचे कार्यालय आहे. याच कार्यालयात सकाळी विजयकुमार नायर यांचे कर्मचारी उल्हास गायकवाड आले असता आपल्या मालकांनी आत्महत्या केल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी या घटनेची माहिती त्वरित नागोठणे पोलिसांना दिली. विजयकुमार यांनी आपल्या व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते आणि सध्या ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात धंदा जास्त होत नसल्याने त्याचा मानसिक तनाव सहन न झाल्याने विजयकुमार यांनी आत्महत्या केल्याची नोंद नागोठणे पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
याप्रकरणी नागोठणे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून नागोठणे पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. जितेंद्र चव्हाण पुढील तपास करीत आहेत.








Be First to Comment