पनवेल, दि.11 (संजय कदम)
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र शासनाने निर्बंध घातले आहेत. असे असताना थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर पनवेल परिसरातील अनेक फार्म हाऊसवर विविध प्रकारच्या पार्ट्या आयोजित केल्या जातात व त्याची जाहिरात सोशल मिडीयाच्या माध्यमातून केली जाते. अशा फार्म हाऊसची माहिती घेण्यास सुरूवात झाली असून अशा प्रकारचे नियोजन आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि रवींद्र दौंडकर यांनी दिली आहे.
थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर मुंबईपासून जवळ असलेल्या पनवेल परिसरात फार्म हाऊस, रिसॉर्ट, खाजगी घरे आदी ठिकाणी विविध प्रकारच्या पार्ट्या आयोजित करण्यात येतात. काही फार्म हाऊस त्यासाठी भाड्याने दिले जातात. अशा ठिकाणी सेलिब्रेशन साठी वेगवेगळ्या प्रकारचे अवैध कृत्य देखील केले जातात.अर्थातच यासाठी माणसांची जमवाजमव होते. मोठ्या प्रमाणात डिजे लावण्यात येतात. नाच, गाणी, मद्य, ड्रग्स आदी अंमलीपदार्थ पुरविले जातात. सध्या शासनाने अशा प्रकारच्या पार्ट्यांवर निर्बंध घातले आहेत. असे असतानाही जर कोणी नियम तोडले व याची माहिती मिळाली तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. याबाबत संबंधित फार्म हाऊस माालकांनी व चालकांनी येत्या 15 तारखेपर्यंत याबाबतची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात द्यायची आहे. अशा प्रकारे फार्म हाऊसची सर्व प्रकारची माहिती घेणे सुरू असून त्यांना भादवी कलम 149 अन्वये नोटीसा बजाविण्यात येणार आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर नागरिकांनी सर्व नियम व अटींचे पालन करून नववर्षाचे स्वागत करावे असे आवाहन देखील रवींद्र दौंडकर यांनी केले आहे.
कोरोनाविषाणू च्या पार्श्वभूमीवर कित्येक चांगले सामाजिक उपक्रम रद्द होत असताना आपल्या संस्कृतीचा भाग नसतानादेखील नववर्षाच्या रात्री धांगडधिंगा घालण्याचे प्रकार गेली अनेक वर्षे वाढीस लागली आहेत. पनवेल तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांची भूमिका निश्चितच कौतुकास्पद असून अन्य पोलिस स्थानक आणि देखील त्यांच्या कृतीचे अनुकरण करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया जनमानसातून उठत आहे. पोलिसांनी दिलेल्या ताकीदीकडे दुर्लक्ष करून जर पार्टी बहाद्दर 31 डिसेंबरच्या रात्री फार्महाऊसवर जमणार असतील तर त्यांचे नववर्ष स्वागत समारंभ जेल मध्ये साजरे केले जातील हे मात्र निश्चित.







Be First to Comment