Press "Enter" to skip to content

मालमत्ता कराच्या विरोधात एकता सामाजिक संस्था आक्रमक


विरोध दर्शवण्यासाठी रविवार पासून राबविणार रहिवाशांचे स्वाक्षरी अभियान


पनवेल/ प्रतिनिधी: –

पनवेल महानगरपालिकेने लादलेल्या मालमत्ता करा विरोधात कामोठे येथील एकता सामाजिक संस्थेने आक्रमक होत पुढाकार घेतला आहे. या जाचक कराला विरोध करण्यासाठी १ लाख नागरिकांच्या स्वाक्षर्‍या घेऊन पालिका आयुक्तांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. रविवारपासून या मोहिमेला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती अमोल शितोळे यांनी दिली.
२०१६ साली पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाली. परंतु अद्याप वसाहती हस्तांतरित झालेल्या नाहीत. साफसफाई, धूर फवारणी  आणि घनकचरा व्यवस्थापन वगळता इतर सेवा सिडकोच पुरवत आहे. संपूर्ण नोड सर्व सेवांसह वर्ग झाल्यानंतरच वास्तविक पाहता  महापालिकेने मालमत्ता कर घेणे अपेक्षित आहे.
गेली अनेक वर्ष सिडकोला सेवा कर भरून सुद्धा सिडको सुविधा देण्यास असमर्थ आहे. त्यात महापालिकेकडे अद्यापही पुरेसे मनुष्यबळ नाही. पनवेल पालिकेने कामोठे नोडला एकही सेवा किंवा विकास काम केले नाही. मग मालमत्ता कर कोणत्या हक्काने मागितला जात आहे? असा सवाल येथील रहिवाशांनी केला आहे. वसाहतीत  मुलांना खेळण्यासाठी एकही उद्यान आणि मैदान नाही, पाण्याच्या नावानं बोंबाबोंब आहे, फुटपाथ आहेत पण त्यावरून चालणे शक्य नाही, रस्त्या खड्ड्यात आहेत कि खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. अशा एक ना अनेक समस्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. नोटीसी मध्ये ज्या इमारतीच्या समोरून १२ मीटर रुंद रस्ता गेला आहे त्यांना कर जास्त तर कमी रुंद रस्ता असलेल्यांना कर कमी हे काय तर्कशास्त्र आहे ??? असा प्रश्‍न एकता  सामाजिक संस्थेने उपस्थित केला आहे .  ऑक्टोबर २०१६ पासून पनवेल मनपाने कोणत्या मूलभूत सुविधा पुरवल्या असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. घनकचरा व्यवस्थापन वगळता इतर पायाभूत सुविधा सिडको पुरवत आहे. त्यामुळे मागील चार वर्षांचा मालमत्ता कर महापालिका कशी काय घेऊ शकते असाही प्रश्‍न विचारला जात आहे. सिडकोच्या सेवा करा पेक्षा मनपाचा मालमत्ता कर खूप जास्त आहे. तो सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारा आहे. त्याचबरोबर सर्वांना समान मालमत्ता  कर असणे आवश्यक असल्याचे मत एकता सामाजिक संस्थेचे मंगेश अढाव  यांनी व्यक्त केले आहे. या पार्श्‍वभूमीवर एक लाख नागरिकांच्या स्वाक्षर्‍या घेऊन पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता कराला विरोध केला जाणार आहे.

घाई कशासाठी???

पनवेल महानगरपालिकेकडे अद्याप मनुष्यबळ नाही. आकृतिबंध मंजूर झालेला नाही. त्यामुळे ते सेवा पुरविण्यास असमर्थ आहेत. असे असताना मालमत्ता कर वसूल करण्याची घाई कशासाठी असा आमचा सवाल आहे. त्यामध्ये अनेक त्रुटी आणि चुका आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर एक प्रकारे अन्याय होणार आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर एकता सामाजिक संस्थेने मनपाच्या मालमत्ता कराला विरोध दर्शवला आहे. या अगोदर प्रशासनाला तशा आशयाचे पत्र सुद्धा देण्यात आले आहे. आता रहिवाशांचा विरोध संघटितपणे दर्शवण्यासाठी एक लाख स्वाक्षर्‍या करण्याचा संकल्प संस्थेने केलेला आहे. रविवार पासून त्याला सुरुवात होणार असून त्याला व्याप्त  स्वरूप देण्यात येणार आहे.


अमोल शितोळे
एकता सामाजिक संस्था, कामोठे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.