
सिटी बेल लाइव्ह / श्रीवर्धन / संतोष सापते #
रायगड जिल्ह्यातील कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाने 15 जुलै ते 24 जुलै या कालावधी लॉक डाऊन ची घोषणा केलेली आहे. त्याअनुषंगाने श्रीवर्धन तालुका प्रशासन व पोलिस यंत्रणेने अतिशय चांगले नियोजन करत लॉक डाऊन चा पहिला दिवस यशस्वी केलेला आहे. पोलीस प्रशासनाकडून श्रीवर्धन शहरातील तीन ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली. शहर व तालुक्यातील इतर ठिकाणी विनाकारण बाहेर फिरणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. श्रीवर्धन मधील पेशवे प्रवेशद्वार, शिवाजी चौक, तसेच वाळवटी रस्ता सर्वत्र पोलीस तैनात करण्यात आले होते आज सकाळपासून श्रीवर्धन मध्ये पावसाचे प्रमाण नगण्य होते. पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेन्द्र खिरड, हवालदार जयेंद्र पेढवी, वाहतूक पोलीस दत्तात्रेय पाटील, त्यासोबत इतर 12 पोलीस कर्मचारी, दहा होमगार्ड व पेट्रोलिंग 2 आणि फिक्स पॉईंट 4 या स्वरूपात पोलीस तैनात करण्यात आले होते. श्रीवर्धन शहरातील व्यापारी वर्गाने लॉकडाउनच्या घोषणेला उत्तम प्रतिसाद दिला आहे. तालुक्यातील सर्व अत्यावश्यक सेवा सुरळीतपणे चालू आहेत.






Be First to Comment