Press "Enter" to skip to content

उरण मधील पर्यावरण,रोजगार, साडेबारा भूखंडाचा प्रश्न सोडविण्याचा निर्धार

नवी मुंबई ९५ गावं नैना प्रकल्प व इतर प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची उरण येथे बैठक संपन्न

सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे ।

नवी मुंबई ९५ गावं नैना प्रकल्प व इतर प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या माध्यमातून उरण तालुका मु. चाणजे मुळेखंड येथे उरण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या प्रश्न मागण्या या संदर्भात ॲड. सुरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

उरण तालुक्यातील द्रोणगिरी से.४४ व ६२ मधील सिडको मार्फत पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करून व पर्यावरण खात्याची परवानगी न घेता होणाऱ्या बेकायदेशीर भरावा मुळे मुळेखड परिसरातील अनेक ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली घरे तुटणार असून शेतकरी विस्थापित होणार असून मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होणार आहे.

त्यामुळे ह्या विरोधात संघटनेच्या माध्यमातून कायदेशीर रित्या जबाबदार अधिकाऱ्यां विरोधात पर्यावरण कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी लवकरच फौजदारी स्वरूपात तक्रार नोंदविली जाणार असल्याचे ॲड. सुरेश ठाकूर यांनी जाहीर केले.

त्याचबरोबर या परिसरात विविध प्रकल्पात निर्माण होणाऱ्या नोकऱ्यात स्थानिक प्रकल्प बाधित तरुणांना डावलून परप्रांतीय लोकांना नोकऱ्या दिल्या जात असून या बाबत शासन निर्णयानुसार ८०% जागा ह्या भूमिपुत्रांना मिळविणे साठी जनआंदोलन केले जाईल असा महत्वाचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

गरजेपोटी बांधलेली घरे नियमीत करण्यासाठी सर्वेक्षण करून नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी तसेच द्रोणगिरी नोड मधील पंचवीस वर्षे प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना १२.५०% योजनेअंतर्गत लाभार्थींना भूखंड वाटप करणे, तसेच या परिसरातील शेतकरी बांधवांचे सिडको कडे प्रलंबित मागण्या संदर्भात त्वरित कार्यवाही साठी जनआंदोलन उभारण्याचे जाहीर करण्यात आले.

सदर सभेस उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष-सुधाकर पाटील, ॲड सागर कडू ,श्रीराम म्हात्रे ,रमाकांत पाटील, ॲड.मदन गोवारी, मधुकर म्हात्रे ,नामदेव शेठ फडके, संतोष पवार, ॲड नीग्रेष पाटील, शेखर शेळके,अरविंद घरत ,दीपक पाटील ,सुमीत थले ॲड नितेश पाटील प्रदीप गोवारी , राजेंद्र मडवीसर, उमेश म्हात्रे, राकेश म्हात्रे अशोक म्हात्रे,साईनाथ पाटील अजित पाटील, शिवचद पाटील, महेश पाटील आदी नवी मुंबई ९५ गावं नैना प्रकल्प व इतर प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे पदाधिकारी-सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.