Press "Enter" to skip to content

परशुराम मोकल यांचे ना.आदितीताई तटकरे यांना निवेदन

जेएसडब्ल्यू प्रशासनाने नवीन जलवाहिनी मधून मोफत शुद्ध पाणी देणे बंधनकारक

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।

तत्कालीन निप्पाॅन डेन्रो इस्पात (आता जेएसडब्ल्यु) प्रशासनाने पाटणसई ते डोलवी पर्यंतच्या ग्रामपंचायतींबरोबर एक सांमजस्य करार करून जोपर्यंत कंपनी चालू आहे तोपर्यंत या पट्ट्यातील सर्व गावांना मोफत पाणीपुरवठा करण्याचे मान्य केलेले आहे. असे असतांनाच आता जेएसडब्ल्यू प्रशासन लोकांना पाणी देण्यास टाळाटाळ करीत आहे. शेतकऱ्यांना हे मान्य नसून जेएसडब्ल्यू प्रशासनाने मोफत पाणी देणे आधीही बंधनकारक होते व आताही आहे. यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस परशुराम मोकल यांनी जिल्ह्याच्या पालक मंत्री ना. कु. आदितीताई तटकरे यांची सुतारवाडी येथे भेट घेऊन त्यांना याविषयीचे निवेदन दिले.

यावेळी राष्ट्रवादीचे नागोठणे विभागीय नेते भाई टके, पेण तालुका युवक राष्ट्रवादीचे पेण तालुका अध्यक्ष विकास पाटील, बाळासाहेब टके यावेळी उपस्थित होते.

परशुराम मोकल यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणाचे कारण देत जुनी जलवाहिनी बंद करण्याचे ठरवून कंपनी प्रशासनाने स्वतःसाठी नवीन ११०० मी.मी. व्यासाची मोठी जलवाहिनी टाकली आहे. या जलवाहिनी शेजारीच गावांसाठी दुसरी एक ४०० मी.मी. व्यासाची छोटी जलवाहिनी टाकली. आता दोन्ही नवीन जलवाहिन्यांचे काम पुर्ण होऊनही फक्त कंपनीला सुरळीत पाणीपुरवठा होत आहे. मात्र गावांसाठी टाकलेली नवीन जलवाहिनी सुरु करण्यास जेएसडब्ल्यु प्रशासन वेगवेगळी कारणे देत टाळाटाळ करीत आहे. कंपनी प्रशासनाला आपण दिलेल्या आश्वासनाचा विसर पडलेला आहे. आता जेएसडब्ल्यू कंपनी प्रशासन जनतेला अनेक निर्बंध घालून पाणी विकत देण्याची भाषा करू लागली आहे. गेली अनेक वर्षे येथील जनता कंपनीचे प्रदुषण सहन करीत आहे. पण कंपनीने या भागातील जनतेचा विश्वासघात केला असल्याने आपण याप्रकरणी लक्ष देऊन कंपनीला सर्व गावांना मोफत पाणी देण्यास भाग पाडावे अशी विनंतीही परशुराम मोकल यांनी ना. आदितीताई तटकरे यांच्याकडे केली आहे. या निवेदनाची प्रत खासदार सुनिल तटकरे यांनाही देण्यात आली आहे.

दरम्यान या निवेदनाची तत्काळ दखल घेत ना. आदितीताई तटकरे यांनी राजिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याशी चर्चा करून याप्रकरणी तत्काळ योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार गावांसाठी असलेल्या नवीन जलवाहिनीची गुरुवार पर्यंत चाचणी पूर्ण करून ही नवीन जलवाहिनीही लगेच सुरु करण्याच्या सूचना आपण जेएसडब्लूच्या व्यवस्थापनास केल्याचे डॉ. किरण पाटील यांनी स्पष्ट केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.