जेएसडब्लूच्या निडी येथील जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम सुरु : पाणीपुरवठा उद्या सुरु होण्याचे संकेत
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।
नागोठण्यातील के.टी. बंधाऱ्यातून डोलवी (ता.पेण) पर्यंत गेलेल्या आणि नागोठण्याजवळील निडी गावाजवळील नदीत मोठ्या प्रमाणात फुटलेल्या जेएसडब्लू कंपनीच्या जलवाहिनीचे प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम आज सोमवारी (दि.७) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सुरु करण्यात आले. या जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आल्याने या जलवाहिनीतून होणारा पाणीपुरवठा आज मंगळवारी (दि.८) दुपार नंतर सुरु होण्याचे संकेत जेएसडब्लू प्रशासनाकडून मिळाले आहेत. त्यामुळे गेले महिनाभर पाणी टंचाईच्या झळा सहन करणाऱ्या नागोठण्यासह महामार्गालगतच्या ४२ गावांतील नागरिकांना विशेषता महिलांना दिलासा मिळणार आहे.
रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या आदेशानंतर जेएसडब्लू प्रशासनाने या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. त्यानुसार डोंगरातून नदीच्या पात्रात येणारे व अंबा नदीचे भरतीचे येणारे पाणी अडविण्यासाठी नदीच्या पात्रात मातीने भरलेल्या पिशव्यांनी बंधारा बांधण्याचे काम गेल्या दोन दिवसांत पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळी जलवाहिनी असलेल्या नदीच्या पत्रातील पाणी पंपाच्या सहाय्याने काढण्यात आले असता जलवाहिनी दोन ठिकाणी फुटल्याचे दिसून आले. त्यानुसार जलवाहिनीचे प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम आज सुरु करण्यात आले. मोठे नुकसान झालेल्या ठिकाणी वेल्डिंगच्या सहाय्याने जलवाहिनीवर जाड पोलादी पत्रा बसविण्याचे काम सुरु करण्यात आले होते.
याचप्रकारे दुसऱ्या कमी फुटलेल्या ठिकाणीही दुरुस्ती करण्यात येणार आहे. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख व पेण पंचायत समितीचे सदस्य नरेश गावंड, पळस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हिराजी शिंदे, गजाजन मोकल, जयराज तांडेल, विलास मोकल आदींनी याठिकाणी प्रत्यक्ष येऊन आवश्यक ते सहकार्य केले. जलवाहिनी दुरूस्तीच्या ठिकाणी जेएसडब्ल्युचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी मुरली नायर हे सुध्दा उपस्थित होते.








Be First to Comment