सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
'गेल्या अनेक वर्षांपासून कर्जतच्या एका बाजूकडील नागरिकांना कर्जत शहरात येण्यासाठी तीन - चार किलोमीटरचा फेरा घ्यावा लागतो. त्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या कामासाठी निधी उपलब्ध करून जुन्या फाटकाच्या जागेवर रेल्वे खालून भुयारी मार्गाचा प्रश्न मार्गी लावू. या कामासाठी कर्जत नगरपरिषदेकडून काही प्रमाणात निधी उपलब्ध होणार असल्याने ही समस्या लवकरच सुटेल.' असा विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी येथे व्यक्त केला. कर्जत व नेरळ रेल्वे स्थानकावरील समस्या समजून घेण्यासाठी व प्रवाशांना सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
दुपारी बाराच्या सुमारास बारणे नेरळ रेल्वे स्थानकात पोहोचले. त्यावेळी त्यांच्या समवेत मयूर जोशी, संतोष पाटील, भालचंद्र जोशी, नेरळचे सरपंच रावजी शिंगवा, सदस्य प्रथमेश मोरे, जयश्री मांनकामे, नेरळ शहर प्रमुख रोहिदास मोरे, विश्वजित नाथ, सूर्यकांत चंचे, भगवान चव्हाण, स्टेशन व्यवस्थापक हरिश्चंद्र वर्मा, नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर आदी उपस्थित होते.
बारणे यांनी नेरळ रेल्वे स्थानकाची पाहणी करताना 'फलाट एक आणि दोन वर निवारा शेड, मुंबई एन्ड कडे पादचारी पूल, फलाट एक वर स्वच्छता गृह, स्काय वॉक, फलाट वरील पादचारी पुलापर्यंत रुग्णवाहिका येण्यासाठी दोन्ही बाजूंनी रस्ता, फलाट एक वर फूड स्टॉल, फलाट एक वरील तिकीट खिडकी दिवसभर सुरू ठेवणे, मुंबई - पुणे दरम्यान धावणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्यांना थांबा, सरकता जिना, लिफ्ट' आदी समस्या त्यांच्याकडे मांडल्या. त्यानंतर ते लोकलने कर्जत रेल्वे स्थानकात आले. नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, मुख्याधिकारी पंकज पाटील, स्टेशन व्यवस्थापक भारद्वाज सक्सेना आदींनी त्यांचे स्वागत केले.
स्टेशन व्यवस्थापकांच्या दालनामध्ये त्यांनी समस्या यावेळी त्यांनी कर्जतकरांची सुमारे पस्तीस - चाळीस वर्षांपासूनची मागणी असलेल्या जुन्या रेल्वे फाटकाच्या जागी भुयारी मार्ग तयार करण्याच्या जागेची पाहणी केली. यावेळी भुयारी मार्गासाठी येणाऱ्या खर्चा पैकी दहा - पंधरा टक्के निधी नगरपरिषद करील असे नगराध्यक्ष जोशी व मुख्याधिकारी पाटील यांनी सांगितले.

यावेळी रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पंकज पाटील यांनी 'कोविड काळात मेल एक्सप्रेचे कर्जतचे थांबे रद्द केले आहेत. ते सुरू करावेत अन्यथा प्रवाशांचा उद्रेक होईल असे सांगून कोंकणात जाणाऱ्या एकमेव पुणे - एर्नाकुलम गाडीला कर्जतला थांबा द्यावा अशी मागणी केली. आरक्षण खिडकीची वेळ वाढवावी, लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी आरक्षित डब्यांचे इंडिकेटर लावावेत, फलाटाच्या मध्यभागी पादचारी पूल आदी मागण्या खासदार बारणे यांच्याकडे करून निवेदन दिले.
यावेळी रेल्वे पोलीस निरीक्षक अविनाश आंधळे, कर्जत पोलीस स्टेशनचे निरीक्षक अरुण भोर, नगरसेवक विवेक दांडेकर, संचिता पाटील, प्राची डेरवणकर, केतन जोशी आदी उपस्थित होते.








Be First to Comment