Press "Enter" to skip to content

उरणच्या सुसज्ज हॉस्पिटलचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।

राज्यावर कोरोनाच्या महामारी संकटाचे सावट असल्याने उरणकरांना कोविड हॉस्पिटलची नितांत गरज असल्यानेच आज कोविड हॉस्पिटल सुरू केले आहे. तसेच उरणकरांचा प्रलंबित असलेल्या सुसज्ज हॉस्पिटलचा प्रश्नही आपण राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी नक्कीच मार्गी लावेल असा विश्वास रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी उरणला कोविड हॉस्पिटलच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केला.

बोकडविरा गावाजवळील सिडको ट्रेनिंग सेंटर मध्ये कोव्हीड १९ रूग्णांसाठी दि.बा.पाटील संघर्ष समिती उरण पनवेल यांच्या विनंतीनुसार मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने सिडकोच्या माध्यमातून कोव्हीड १९ रूग्णांसाठी ५० ऑक्सिजन बेडचे हॉस्पिटल उरणकरांसाठी उपलब्ध झाले असून, कोव्हीड 19 आजारांमुळे उरणमधील अनेक नागरिकांचा जीव गमावला आहे. भविष्यामध्ये उरण वासियांवर अशी बिकट परिस्थिती येऊ नये म्हणून राज्याचे मुख्यमंत्री व महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी पूर्णपणे दखल घेऊन दिलासा देण्याचे काम केले आहे.

आज पालकमंत्री रायगड आदितीताई तटकरे यांच्या शुभहस्ते सदर कोव्हीड १९ सेंटरचे उदघाटन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, माजी आमदार मनोहरशेठ भोईर,कामगार नेते महेंद्र घरत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, भावना घाणेकर, मनोज भगत, सभापती सागर कडू, जिप सदस्य विजय भोईर, बाजीराव परदेशी, कुंदा ठाकूर, पंस सदस्य दीपक ठाकूर, दिनेश म्हात्रे, जे. डी. जोशी, संतोष ठाकूर, जिल्हाधिकारी निधी चौधरी, सिडकोचे अधिकारी वर्ग व आरोग्य विभागाचे अधिकारी वर्गासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री आदिती तटकरे यांनी प्रथम रानसई आदिवासी वाडीवर पिण्याच्या पाणी संचाचे वाटप करण्यात आले. त्यावेळी तेथील रस्त्यांची बिकट अवस्था पाहून उरण हा औद्योगिक दृष्टया सबळ असला तरी येथील अनेक भाग हे अद्यापही विकासापासून वंचीत असल्याचे आज प्रत्यक्षात दिसून आल्याचे सांगत येथील परिस्थितीची माहिती घेऊन येथील समस्यां महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी आपण निश्चीतच प्रयत्न करू असे तटकरे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

कोरोनाचा संकट राज्यावर ओढवले आहे. जिल्ह्यात पनवेल, उरण व पनवेल येथे कोरोनाचे पेशंट जास्त आढळलंत होते. त्यात आता दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उरणमध्ये कोरोना हॉस्पिटलची नितांत गरज होती. ती आज पूर्ण झाली असून कोरोनाग्रस्तावर याच ठिकाणी उपचार करता येणे शक्य होणार आहे. यामुळे कोरोनाने मृत्यू होण्याचा आलेख नक्कीच कमी होणार आहे. तसेच उरणकरांसाठी सुसज्ज उपजिल्हा हॉस्पिटलचा प्रश्न प्रलंबित आहे. त्याचा पाठपुरावा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, बबनदादा पाटील, महेंद्र घरत, प्रशांत पाटील आदींसह अनेक नेतेगण करीत आहे. तोही महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामार्फत नक्कीच लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासन याप्रसंगी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी उरणकरांना दिले आहे.

यावेळी बबनदादा पाटील, मनोहरशेठ भोईर, महेंद्र घरत, प्रशांत पाटील, जिल्हाधिकारी निधी चौधरी आदींनी मार्गदर्शन केले. उरण नंतर आता येत्या काही दिवसांत पनवेल येथे कोविड हॉस्पिटलचे उदघाटन पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे बबनदादा पाटील यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.