Press "Enter" to skip to content

रायगड जिल्ह्यात कोरोना फोफावतोय : रुग्णांची संख्या 9 हजाराच्या घरात

230 जणांचा कोरोनाने घेतला बळी

कोरोनापेक्षा  लॉकडाऊनमध्ये भुकबळीने मरण्याची गोरगरिबांना भीती

लॉकडाऊनच्या बेनीफिटकडे जिल्ह्याचे लक्ष!

सिटी बेल लाइव्ह / रायगड (धम्मशिल सावंत)

कोरोनाच्या जैविक महामारीने संपूर्ण जग कवेत घेतले आहे. जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने  देश, राज्य व जिल्ह्याजिल्ह्यात देखील अक्षरशः हाहाकार माजविला आहे. रायगड जिल्ह्यात देखील दिवसेंदिवस कोरोना फोफावतोय. ग्रामीण व शहरी भागाला कोरोनाने वेढा दिला आहे. रुग्णांची संख्या 9 हजाराच्या घरात पोहचली आहे.जिल्ह्यात आजवर  230 जणांचे कोरोनाने  बळी  घेतले आहेत.  गुणाकार पद्धतीने वाढणारी ही रुग्ण संख्या नियंत्रणात आणताना आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाची दमछाक झाली आहे. दि.15 तारखेपासून दि.24 तारखेपर्यंत जिल्ह्यात लॉक डाऊन सुरू झाला आहे. 

लॉकडाऊनचे बेनिफिट

राज्यात व देशात अनेकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला नागरिकांनी अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद देखील दिला तरी रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचेच  दिसून आले. त्यामुळे रायगड जिल्ह्यात हा दहा दिवसाचा लॉकडाऊन किती उपयुक्त ठरेल याकडे मात्र जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अशातच लॉक डाऊन व्यापारी वर्गासह सर्वसामान्य वर्गाला परवडण्यासारखा नसल्याने काही ठिकाणी कडाडून विरोध तर काही ठिकाणी समर्थन होताना दिसत आहे.  

कोरोनाने नव्हे भूकबळीने मरणाची भीती

करोना, सततचा लॉकडाऊन आणि निसर्गचक्री वादळाने रायगडकर पुरते मेटाकुटीला आले आहेत. या काळात अनेक बड्या उद्योगधंदे, कंपन्यानी मजूर व कामगार कपातीचे धोरण अवलंबिल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्तिती झाली आहे. अनेकांच्या चुली विझल्या आहेत. यातच हातावर पोट असलेले मजूर, कष्टकरी, श्रमजीवी, आदिवासी बांधव यांचा देखील रोजगार संपुष्टात आल्याने कोरोनाने नव्हे तर भूकंबळीने मरण्याची भीती या गोरगरीब सर्वसामान्य वर्गाला सतावते आहे. सरकारने अन्न धान्य साठा पुरवावे व गरिबाला या काळात जगवावे अशी मागणी आता तळागळातून जोर धरतेय. 

सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त

सलग दोन महिने बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना काही काळ विश्रांती मिळाली होती, मात्र जिल्ह्यात  पुन्हा  कडक  लॉक डाऊन सुरू झाल्याने जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात झालेला दिसून येतोय. नियम मोडणाऱ्यांवर पोलीस कारवाई करताना दिसत आहेत.

रुग्णसंख्या वाढतेय गुणाकार पद्धतीने

रायगड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण गुणाकार पद्धतीने वाढत आहेत, रुग्णांची साखळी तोडणे कठीण झाले आहे.  रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासात करोनाचे ४६३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात २५० जण करोनावर मुक्त झाले आहे. चिंताजनक बाब म्हणजे आठ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता 9 हजाराच्या घरात गेली आहे.  सध्या ३ हजार ४२२ करोनाचे रुग्ण आहेत. तर ५ हजार २०६ रुग्ण करोना मुक्त झाले आहे.जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्के ५९ टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण २ टक्के टक्के आहे. 

कोरोनाने मरणाची भीती

 करोनाची तपासणी झाल्यानंतर रिपोर्ट येईपर्यंत भीतीने संबंधीत व्यक्ती व संपूर्ण कुटुंब प्रचंड भीती व तणावात असते, कुटुंबातील एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तरी संपूर्ण कुटुंबाला जणू वेठीस धरले जाते. रुग्णवाहिका येण्यापासून ते दवाखान्यात जाऊन Swab टेस्ट होईपर्यंत व पुढील उपचारासाठी पनवेल , कलंबोली  येथील दवाखान्यात पोहचेपर्यंत जे हाल होतात याची कल्पना न केलेली बरी. म्हणून कोरोनाचे नाव काढले की सर्वांच्या अंगावर काटा उभा राहतो. ग्रामीण भागात तर कोरोनाची दहशत मोठी आहे. त्यामुळे लोक अधिक सतर्क राहून काळजी घेताना दिसत आहेत. सुधागड तालुका कोरोनामुक्त आहे, मात्र जिल्ह्यात लॉक डाऊन जाहीर झाल्याने सुधागड तालुक्यातील रस्ते ओस पडलेत, बाजारपेठेत शुकशुकाट आहे. हीच परिस्तिती जिल्हयातील बाजारपेठ व गावोगावी दिसते. कारण कोरोनाने आणलेली मरणाची भीती कुणालाही उन्मात  करू देत नाही. जिल्ह्यात 

कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने सुरुच आहे. गेल्या चोवीस तासात तब्बल ४६३ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या ८ हजार ८५८ वर पोहोचली आहे. २९६ जणांचे तपास अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

463 नव्या कोरोना बाधितांची भर

       जिल्ह्यात ४६३ नव्या करोना बाधितांची भर पडली आहे. यात  पनवेल मनपा हद्दीतील १८०, पनवेल ग्रामिण मधील ७१, उरण मधील १०, खालापूर ४७, कर्जत १८, पेण ६८, अलिबाग १३, माणगाव १९,  रोहा १,  म्हसळा २, महाड १२ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीत ४, महाड ३, श्रीवर्धन १ येथे रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात २५० जण करोना मुक्त झाले आहेत.  

   जिल्ह्यातील ३० हजार ४०३ जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ४२२ करोना बाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १ हजार ४८४, पनवेल ग्रामिण हद्दीतील ४६१, उरण मधील १६१,  खालापूर २७०, कर्जत १२१, पेण ३६५, अलिबाग २२१,  मुरुड ४६, माणगाव ६९, तळा येथील ५, रोहा ८२, सुधागड ०, श्रीवर्धन २८, म्हसळा ४९, महाड ४३, पोलादपूर मधील १७ करोना बाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात आत्ता पर्यंत २३० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्के ५९ टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण २ टक्के टक्के आहे. 

कारखाने जोमात सुरू 

रायगड जिल्हयात लॉक डाऊन घोषित केला असला तरी जिल्ह्यातील कारखाने मात्र जोमात सुरू आहेत, येथील अनेक कंपन्यांमधून कोरोनाचा संसर्ग फैलावत असल्याने  लॉकडाऊन मध्ये कारखाने बंद ठेवण्याची मागणी जिल्ह्यात जोरदार होत आहे. 

कोरोना कधी संपेल ?

कोरोना कधी संपेल, कधी जनजीवन सुरळीत होणार?सुखाचा घास कधी मुखी जाणार, सर्वच पूर्वपदावर कधी येणार या अपेक्षेत असलेला रायगडकर कधी   लॉक डाऊनच्या विळख्यात तर कधी कोरोनाच्या मगर मिठीत सापडत असल्याने चिंता काही केल्या संपत नसल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे, अशातही रायगडकर मोठा आशावादी असल्याने कोरोनाला आम्ही नक्की हरवणार, रायगडला कोरोना मुक्त करणार असाही आवाज ऐकू  येताना दिसतोय.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.