सिटी बेल लाइव्ह । पोलादपूर । शैलेश पालकर ।
पोलादपूर नगरपंचायतीमध्ये लॉकडाऊन आणि अनलॉक प्रक्रियेमध्ये एकमेव कारकून पदावरील अपंग व्यक्ती असलेले रूपेश काशिनाथ जाधव यांचा गुरूवार, दि. 2 डिसेंबर 2020 रोजी अपंगदिनाच्या पार्श्वभुमीवर नगराध्यक्ष राजन पवार आणि मुख्याधिकारी विराज लबडे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
पोलादपूर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर समावेशन प्रक्रियेमध्ये ग्रामपंचायतीचे कारकून असलेले रूपेश काशिनाथ जाधव यांचे नगरपंचायतीच्या कर्मचारी वर्गामध्ये समावेशन करण्यात आले. गेल्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊन आणि अनलॉक प्रक्रियेमध्ये अपंग कर्मचाऱ्यांना अनुपस्थित राहण्याची मुभा असताना रूपेश जाधव यांनी अपंगत्व असूनही कोणत्याही प्रकारे कर्तव्य कुचराई न करता कोविड संसर्ग पार्श्वभूमीवर तत्पर सेवा दिली. पोलादपूर नगरपंचायत कार्यालयामधील एकमेव कारकून असल्याने रूपेश जाधव यांनी त्यांच्यावरील जबाबदारीची जाणीव ठेऊन लॉकडाऊन काळामध्ये एकही दिवस सुट्टी न घेता नगरपंचायतीच्या कामकाजामध्ये नियमित सहभाग घेऊन जनतेची सेवा अव्याहतपणे सुरू ठेवल्याने त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय नगराध्यक्ष राजन पवार आणि मुख्याधिकारी विराज लबडे यांनी घेतला.
नगरपंचायतीमध्ये सर्व कर्मचारी वर्गाच्या उपस्थितीत शाल व पुष्पगुच्छ देऊन रूपेश जाधव यांना अपंगदिनाचे औचित्य साधून सन्मानित करण्यात आले.








Be First to Comment