सिटी बेल लाइव्ह । पोलादपूर । शैलेश पालकर ।
तालुक्यातील लहुळसे सारख्या ग्रामीण दूर्गम भागातील प्रगतशील शेतकऱ्याने सेंद्रीय भूईमूग पिकाची यशस्वी लागवड करून भाताच्या चौपटीने उत्पन्न घेतल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ यांनी येथे दिली.
तालुक्यात सन 2020-21 मधील पाऊस हा 4300 मि.मी. झाला असून पारंपरिक भात पिकाला पर्यायी पीक म्हणून श्रीजननी कुंभळजा सेंद्रिय शेती गट मौजे लहुळसे येथे प्रगतीशील शेतकरी विठोबा रामजी रिंगे व विजय गंगाराम रिंगे यांनी तालुका कृषीअधिकारी कार्यालय पोलादपूर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषी विद्यापीठ,अकोला यांनी तयार केलेल्या मोरणा व वारणा जातीचे भुईमूग बियाणे घेऊन त्याची खरीपात लागवड केली व एकरी 10 क्विंटल असे उत्पादन आले आहे.
भात पिकाबरोबर भुईमूग पिकाची लागवड शेतकऱ्यांनी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कार्यलयामार्फत करण्यात येत आहे. लहुळसे येथील प्रगतशील शेतकरी रिंगे यांचेकडील खरीपात भुईमूग हा प्रयोग यशस्वी झाला आहे. रानडुकरे संरक्षणाकरीता शेतकऱ्यांनी 4 फूट उंचीची नायलॉनची जाळी शेताच्या कडेने बांधावर लावली असता रानडूकरांच्या शिंगामध्ये जाळी अडकत असल्यामुळे रानडूकरे शेताकडे फिरकत नाहीत, असा रानडूकरांचा प्रार्दूभावसुध्दा होत नाही तसेच जाळीचा एकरी खर्च अंदाजे 5 हजार रूपये इतका येतो व ही नायलॉनची जाळी तीन वर्षापर्यत टिकू शकते, अशी माहिती यावेळी तालुका कृषी अधिकारी धुमाळ यांनी दिली.
हळदुळेतील प्रगतशील शेतकरी रिंगे यांचेकडे मोरणा व वारणा या जातीचे 20 क्विंटल बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे शेतकऱ्यांनी सदरची भुईमुगाची लागवड डिसेंबर अखेर केली तर खरीप हंगामापेक्षाही जास्त उत्पन्न मिळेल असा विश्वास तालुका कृषी अधिकारी धुमाळ यांनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांनी विठोबा रिंगे व विजय रिंगे यांचेकडून बियाणे उपलब्ध करून घ्यावे, असे आवाहनही यावेळी तालुका कृषी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.








Be First to Comment