Press "Enter" to skip to content

१ डिसेंबर ते १६ डिसेंबर दरम्यान राबविण्यात येणार मोहीम

नागोठणे प्रा.आ.केंद्रातर्फे कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण संयुक्त शोधमोहीमेचा शुभारंभ

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।

रायगड जिल्हा परिषद अलिबाग अंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सूचनेनुसार नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राकडून कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण संयुक्त शोधमोहीमेचा सुभारंभ दि.१ डिसेंबर रोजी नागोठण्यातील प्रा. आ. केंद्रात करण्यात आला.

नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या एकूण ५७ गावांमध्ये तसेच वाडी-वस्तीवर आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांच्या मार्फत या मोहिमेअंतर्गत घरोघरी भेटी देऊन घरांतील व्यक्तीना तपासून कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण यांचा शोध घेऊन उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आरोग्य शिक्षण व नवीन आलेल्या रुग्णांना मोफत औषधोपचार देण्यात येणार आहेत अशी माहिती वैैद्यकीय अधिकारी डॉ.चेतन म्हात्रे यांनी दिली आहे.

दरम्यान या मोहिमेत संशयित आढळलेल्या रुग्णांची तपासणी आरोग्य केंद्र नागोठणे येथे करण्यात येणार असून यामध्ये आढळलेल्या कुष्ठरुग्ण तसेच क्षयरुग्ण यांना त्वरित औषधोपचाराखाली आणून या रोगांवर नियंत्रण ठेवणे हेच या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.तसेच या संदर्भातील माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र नागोठणे यांच्याकडून आरोग्य सेवक व आशा स्वयंसेविका यांच्या मार्फत गाव,वाडी-वस्तीत नागरिकांना देण्यात आली असल्याचेही डॉ.चेतन म्हात्रे यांनी सांगितले.

दरम्यान संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधमोहीमे अंतर्गत रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष किशोर जैन यांच्या उपस्थित विशेष प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या विशेष प्रचार फेरीत नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.चेतन म्हात्रे, डॉ.स्नेहल कोळी, नागोठणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच डॉ.मिलिंद धात्रक, उपसरपंच सुरेश जैन, सदस्य अखलाक पानसरे, ज्ञानेश्वर सांळुखे यांच्यासह नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक यशवंत कर्जेकर, हिरामण डोलकर आरोग्य सेवक हेमंत लांगी, वालगुडेे, कदम, तांबोली सहभागी झाले होते.

संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधमोहीम ही मोहीम १ डिसेंबर २०२० ते १६ डिसेंबर २०२० दरम्यान राबविण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.चेतन म्हात्रे यांनी दिली आहे ‌.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.